कुडाळ : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या उमेदवार आफ्रिन करोल यांनी भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांचा ९ विरुद्ध ८ मतांनी पराभव केला आहे.कुडाळ नगरपंचायतच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आठ जागांवर तर शिवसेनेने सात जागांवर यश मिळवले होते. तर काँग्रेसने या नगरपंचायतीच्या दोन जागांवर यश मिळविल्या. नंतर काँग्रेसने नगराध्यक्ष पदाची मागणी केली होती. त्यानुसार नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या आफ्रिन करोल यांनी तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.
या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे संख्याबळ असले तरी भाजपने नगराध्यक्ष निवडणुकीत चमत्कार घडेल, असा दावा केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत काँग्रेसच्या आफ्रिन करोल यांनी ९ विरुद्ध ८ मतांनी विजय मिळवल्याने कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.निवडणुकी दरम्यान सकाळी शिवसेना-भाजपामध्ये मोठा राडा झाला. आमदार वैभव नाईक यांची गाडी रोखल्याने भाजपा- शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुकी देखील झाली. यामुळे येथील वातावरण तणावपुर्ण बनले होते.