कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीवर काँग्रेस पक्षाचाच उमेदवार नगराध्यक्षपदी बसणार आहे. भाजपात गेलेले काका कुडाळकर हे जर या निवडणुकीत उतरलेत तर ही निवडणूक जिंकायला आम्हाला अधिकच सोपे जाईल, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी कुडाळ नगरपंचायतीबाबत विचारले असता व्यक्त केला. सतीश सावंत कुडाळ येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.यावेळी कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. या निवडणूक संदर्भात काय रणनीती आखणार असे विचारले असता सावंत म्हणाले, सद्य:स्थितीत जनता आमच्या पाठीशी असून, कुडाळ नगरपंचायतीमध्येही ती आमच्या पाठीशी राहणार आहे. या नगरपंचायतीवर सत्तादेखील आमचीच येऊन नगराध्यक्षही आमचाच असणार आहे. या निवडणुकीत काही विरोधक उभे राहणार आहेत. याचादेखील फायदा आम्हाला होणार आहे. या विरोधकांत हल्लीच भाजपात गेलेले काका कुडाळकर या निवडणुकीत उतरलेत तर ही निवडणूक जिंकायला आम्हाला अधिकच सोपे जाईल, असा टोला त्यांनी काका कुडाळकर यांना लगावला. येत्या मार्च महिन्यापर्यंत जिल्हा बँकेच्यावतीने जिल्ह्यातील आठ तालुक्यांत कॅश डिपॉझीट मशीन बसविण्यात येतील. तसेच ई-सेवा देण्यात येईल. यामध्ये रेल्वे, विमान तिकीट काढता येईल, क्रेडिट कार्डही लवकर सुरू करण्यात येईल. येत्या २४ नोव्हेंबरअगोदर शेळी मेंढी, कुक्कुट पालन व्यवसायास चालना देण्याबाबत धोरण ठरविले जाईल व बेरोजगारांसाठी नव्या योजना जिल्हा बँकेच्यावतीने आणण्यात येतील, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश मोर्ये, प्रमोद धुरी, निता राणे, आत्माराम ओटवणेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)आघाडी केली जाईल : सावंत शक्यतो आघाडी करूनच निवडणूक लढविली जाईल. कारण आघाडी न झाल्यास त्याचा बराच फायदा विरोधकांना होतो. हे गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसून येत आहे. राष्ट्रवादी पक्षाशी आघाडी करण्याचे संकेतही यावेळी सावंत यांनी बोलताना दिले.
कुडाळमध्ये काँग्रेसचाच नगराध्यक्ष!
By admin | Published: November 11, 2015 9:12 PM