सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीत काँग्रेसचे चार सदस्य अपात्र ठरल्यानंतर अल्पमतात आलेल्या काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेच्या गोटातही सत्तास्थापनेच्या हालचालींबाबत चर्चा सुरू झाली आहे. सावंतवाडी पंचायत समितीत काँग्रेसच्या चार सदस्यांनी शिवशाही गट स्थापन केला होता. या गटात उपसभापती महेश सारंग, सदस्य विनायक दळवी, नारायण राणे, सुनयना कासकर, आदींचा समावेश होता. या गटाचा शिवसेनेला पाठिंबा द्यायचा विचार होता. मात्र, आपले सदस्यपद जाणार या भीतीने या सदस्यांनी निर्णय मागे घेत पुन्हा आपला शिवशाही गट काँग्रेसमध्येच विलीन करण्याचा निर्णय घेतला; पण त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. अशातच दोन दिवसांपूवी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी या चार सदस्यांना अपात्र केले. काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे. यावर उपसभापती महेश सारंग याचिका दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही पंचायत समितीत सत्तेसाठी हालचाली सुरू केल्या असून, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ तसेच शिवसेनेचे पंचायत समितीमधील गटनेते अशोक दळवी वरिष्ठ नेत्यांशी संपर्कात आहेत. काँग्रेसचे सभापती प्रमोद सावंत यांनी पंचायत समितीत काँग्रेसचीच सत्ता राहील, असा दावा केला आहे. (प्रतिनिधी)
सदस्य अपात्रतेविरोधात काँग्रेस उच्च न्यायालयात
By admin | Published: October 24, 2015 11:36 PM