वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूकीच्या आघाडीचा निर्णय बुधवारपर्यंत लांबणीवर पडला आहे. कणकवलीत रविवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिका-यांची बैठक झाली. मात्र, जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. नामनिर्देशनपत्र भरण्यास तीनच दिवस शिल्लक असल्याने निवडक प्रभागांत स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादीनेही सुरु केल्याची चर्चा आहे.काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वैभववाडीत आघाडी करुन निवडणूक लढण्याच्या सूचना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा पदाधिका-यांना दिल्याचे वृत्त आहे. त्या अनुषंगाने दोन्ही पक्षांच्या पदाधिका-यांची जागावाटपासंदर्भात रविवारी रात्री बैठक झाली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 2 वगळता 1 ते 9 यापैकी कोणतेही सहा प्रभाग आपणास मिळवेत असा आग्रह राष्ट्रवादीने काँग्रेसकडे धरला आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक आणि पाच याठिकाणी काँग्रेसकडे अनेक सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे दोन्हीपैकी एकही प्रभाग राष्ट्रवादीला द्यायला काँग्रेस तयार नसल्याचे समजते. उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटू शकला नाही. त्यामुळे बुधवारपर्यंत जागावाटपाचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. बुधवारच्या चर्चेत अपेक्षित निर्णय होईलच याची शाश्वती नाही. आणि जरी निर्णय झाला तरी आरक्षित प्रभागांमधील उमेदवारांची कागदपत्रे गोळा करून आॅनलाईन प्रक्रियेने नामनिर्देशनपत्र सादर करण्यात अडचण येऊ नये यासाठी सावधगिरी म्हणून स्वबळाच्या दृष्टीने राष्ट्रवादीने तयारी सुरू केल्याचे समजते. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होणार की ते स्वतंत्र लढणार, हे स्पष्ट होण्यासाठी थांबावे लागणार आहे. (प्रतिनिधी)प्रभाग एकमुळे आघाडीत बिघाडी शक्य?वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचा प्रभाग क्रमांक एक खुला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून माजी सभापती अरविंद रावराणे यांचे चिरंजीव संताजी रावराणे यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याच प्रभागातून माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चनिवडणूक लढविणार आहेत. चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक एक आपणास मिळवा, अशी मागणी काँग्रेसकडे केली आहे. त्यामुळे याच प्रभागांवरुन बिघाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काँग्रेस आघाडीचा निर्णय लांबला
By admin | Published: October 05, 2015 9:51 PM