कणकवली : नरेंद्र मोदींसारखा गरीब घरातील मुलगा पंतप्रधान झालेले चाटुगिरी करणाऱ्यांना मान्य नाही. घराणेशाही जोपासणाऱ्यांची खासदाराचा मुलगा खासदार, आमदाराचा मुलगा आमदार ही संस्कृती आहे. ही संस्कृती सामान्यांचा विचार करत नाही. त्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादीची ही घराणेशाही संपवा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित भाजपाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रमोद जठार, अॅड.अजित गोगटे, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उपाध्यक्ष हरेश पाटील, जयदेव कदम, शिशीर परूळेकर, राजन तेली, महिला जिल्हाध्यक्ष राजश्री धुमाळे, अॅड.अभिषेक गोगटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य यापूर्वी उत्पादित वीज इतर राज्यांना देत असे. आता राज्यात भारनियमन करण्याची वेळ आली आहे. वीज नसल्याने उद्योग नाहीत. उद्योगांच्या अभावी युवकांना रोजगार उपलब्ध नाहीत. कॉँग्रेस शासनाने गेल्या पंधरा वर्षांत ७० हजार कोटी रूपये सिंचनावर खर्च केले. या खर्चात राज्यात ०.१ टक्के इतकेच सिंचन वाढल्याचे श्वेतपत्रिकेत जाहीर करण्यात आले. कॉँग्रेसने मते मागताना सिंचनाचे पैसे कुठे गेले त्याचा आधी हिशेब द्यावा आणि मग मते मागावीत. कॉँग्रेसकडे देण्यासाठी खोट्या आश्वासनांव्यतिरीक्त काही नाही. कॉँग्रेसची देशात आणि राज्यात सत्ता असूनही राज्य पहिल्या क्रमांकावरून सहाव्या क्रमाकांवर फेकले गेले आहे. आम्हाला जातीयवादी म्हणणाऱ्या कॉँग्रेस-राष्ट्रवादीने जातीयवाद निर्माण केला. शरद पवार एका बाजूने मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात तर त्यांच्याच पक्षाचे छगन भुजबळ ओबीसींचे राजकारण करतात. धनगर आणि आदिवासींना एकमेकांविरोधात भडकावण्यात आले. महाराष्ट्र आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे राज्य म्हणून दिल्लीत प्रसिद्ध झाले आहे. शरद पवार देशाचे कृषी मंत्री आहेत. मात्र, मध्यप्रदेशचा कृषी विकासाचा दर २४ टक्के आहे. तर महाराष्ट्राचा ३ टक्के एवढाच आहे. उद्योगमंत्र्यांनी आपला विभाग सोडून इतर बरेच उद्योग केले. कोणतीही फाईल हातावेगळी करण्यासाठी वेळ लावायचा हे त्यांचे धोरण असल्याची टीका गडकरी यांनी नारायण राणे यांच्यावर केली. (प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादीची घराणेशाही संपवा
By admin | Published: October 04, 2014 11:28 PM