सिंधुदुर्ग, दि. 16 - काँग्रेस पक्षाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे नुतन जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेस कार्यकारणी,ब्लॉक अध्यक्ष व ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
नुतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत हे राज्याचे माजी मंत्री भालचंद्र उर्फ भाई सावंत यांचे चिरंजीव असून ते गेल्या अनेक वर्षापासून पक्षसंघटनेचे काम पाहत आहेत.
महत्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त होण्यामागे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भाजपाप्रवेश असल्याचं बोललं जात आहे. मात्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी यामागे नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाचा काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे.
विकास सावंत यांना आजच पत्र देण्यात येणार असल्याचं समजत आहे. दरम्यान दुसरीकडे कार्यकारिणी बरखास्त करण्यामागे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षसदस्य नोंदणीसाठी नोंदणी पुस्तके पाठवूनही ती वितरित करण्यात आली नसल्याचे कारण देण्यात आले आहे.