वैभव साळकर, दोडामार्ग : तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायतींना दर्जा मिळाल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक प्रथमच होत आहे. त्यामुळे या पहिल्या-वहिल्या निवडणुकीला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्यापूर्वी सन १९५९ ते आजमितीपर्यंतच्या ५६ वर्षाच्या इतिहासात ग्रामपंचायतीवर काँग्रेस, जनता दल व शिवसेना अशा केवळ तीनच पक्षांना सत्ता मिळविण्यात यश आले आहे. मात्र, त्यातील तब्बल ४५ वर्षे ही ग्रामपंयायत स्थापन झाल्यानंतर पहिले सरपंचपद आणि बरखास्तीवेळी शेवटचे सरपंचपही काँग्रेसनेच भुषविले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेला येथील सत्तेचा अनुभव आहे. मात्र या सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपला यंदा सत्ता मिळविण्याची आशा लागून आहे. यामुळे पहिल्या नगरपंचायतीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा तिरंगा फडकतो की सेना-भाजपचा भगवा याकडे संपूर्ण जिल्ह्यासह कोकणचे लक्ष लागून राहिले आहे. सन १९५९ ते १९७३ पर्यंत म्हणजेच सुरूवातीची १५ वर्षे ग्रामपंचायत काँगे्रसच्या हातात राहिली. सलग पंधरा वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार हाताळणाऱ्या काँग्रेसला जनता दलाने दूर केले आणि कसई दोडामार्ग सारख्या ग्रामीण भागात सूर्यकांत परमेकर यांच्या रूपाने जनता दलाने नेतृत्व उभारणीस सुरूवात केली. त्यावेळी कसई दोडामार्गचे पाचवे सरपंचपद भूषविण्याचा मान सूर्यकांत परमेकर यांना मिळाला. २९ मे १९७८ ते २२ एप्रिल १९८४ पर्यंत ते सरपंच पदावर राहिले. त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसने मुसंडी मारली. ज्ञानेश्वर रामराव गावकर यांनी सहावे सरपंच म्हणून कामगिरी सांभाळत २३ एप्रिल १९८४ ते ३० डिसेंबर १९९२ अशी सलग आठ वर्षे सगळ्यात जास्त काळ सरपंचदावर राहण्याचा मान मिळविला. त्यानंतर आनंद दत्ताराम तांबुळकर यांनी ३१ डिसेंबर १९९२ ते ३० डिसेंबर १९९७ या काळात सातवे सरपंच म्हणून पदभार सांभाळला. त्यानंतर पुन्हा एकदा तेरा वर्षाच्या प्रदीर्घ तपश्चर्येनंतर जनता दलाने उर्मिला उल्हास साळकर यांनी सरपंचपदी विराजमान करून पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. त्यांनी ३० डिसेंबर १९९७ ते ०२ मे २००० पर्यंत सरपंचपद भुषविले. सन २००० च्या मे मध्ये झालेल्या एका वादग्रस्त आंदोलनामुळे त्यांना सरपंचदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे जनता दलाची सत्ता संपुष्टात आली. नववे सरपंच पांडुरंग बोर्डेकर यांच्यारूपाने कसई दोडामार्ग ग्रामपंचायतीवर प्रथमच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेनेसाठी सक्रीय झाले. त्याचीच परिणीती सत्ता स्थापन करण्यात झाली. ३ मे २००० ते ८ जून २००१ असा कार्यकाळ बोर्डेकर यांचा राहिला. त्यानंतर दहावे सरपंचपद प्रतिभा नाईक (१९ जून २००१ ते २९ डिसेंंबर २००२), अकरावे सरपंचपद यशवंत बागकर (३० डिसेंंबर २००२ ते २९ डिसेंंबर २००७) यांनी भूषविले. त्यावेळी ग्रामपंचायतीची १२ वी निवडणूक लागली. त्यावेळी कोणत्याही पक्षाला स्थान न देता गावविकास आघाडी करून निवडणूक लढविण्यात आली आणि गावविकास आघाडीचे पॅनल विजयी झाले. यावेळी राजेश शशिकांत प्रसादी यांना १२ व्या सरपंचपदी निवडण्यात आले. ३० डिसेंबर २००७ ते १ फेब्रुवारी २०११ अशी चार वर्षे ते सरपंचपदावर राहिले. याच काळात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आपसूकच पुन्हा एकदा सत्ता काँग्रेसकडे आली. त्यानंतर १३ वे सरपंच म्हणून सुरेश दादू तुळसकर (०२/०२/२०११ ते १०/०४/ २०११) दोन महिने, तर १४ वे सरपंच म्हणून प्रदिप चांदेलकर (११/४/२०११ ते २९/१२/२९१२) पावणे दोन वर्षापेक्षा अधिक काळ सरपंच पदाचा कार्यभार सांभाळला.