काँग्रेस ग्रामपंचायत निवडणुक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 05:36 PM2020-12-28T17:36:01+5:302020-12-28T17:37:28+5:30
Congress Sindhudurgnews- सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका या काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार आहे . गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जात जिल्ह्यात भाजपची ताकद नगण्य असल्याचे दाखवून देवू. तसेच जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल. अशी पक्षाची आगामी काळातील भूमिका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी स्पष्ट केली.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका या काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार आहे . गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जात जिल्ह्यात भाजपची ताकद नगण्य असल्याचे दाखवून देवू. तसेच जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल. अशी पक्षाची आगामी काळातील भूमिका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी स्पष्ट केली.
कणकवली येथील काँग्रेस कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख , जिल्हा चिटणीस महेंद्र सावंत , सरचिटणीस प्रकाश जैतापकर , कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर , तालुका सरचिटणीस प्रवीण वरूणकर , कणकवली शहराध्यक्ष महेश तेली , प्रदीप तळगावकर , प्रदीपकुमार जाधव , महिला तालुकाध्यक्ष डॉ . सूनीता म्हापणकर , विजय कदम , संदीप कदम , दयानंद बांदेकर , बी . के . तांबे आदी उपस्थित होते .
राजन भोसले म्हणाले , ग्रामपंचायत निवडणुकांसाठी काँग्रेसचा निरीक्षक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी माझी नियुक्ती करण्यात आली आहे . काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून बाळा गावडे यांची निवड झाल्यानंतर गावागावात पक्ष वाढीचे काम सुरू झाले आहे . कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या जोरावर काँग्रेसची संघटना बांधणी सुरू करण्यात आली आहे . यापूर्वी काँग्रेसमधले काहीजण काँग्रेस घेऊन पळून गेले. मात्र , आता ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रदेश स्तरावरून कार्यकर्त्यांना मोठी ताकद दिली जाणार आहे.
ग्रामपंचायत सोबतच दोडामार्ग व वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीही काँग्रेसने महाविकास आघाडी म्हणून ताकद लावली आहे . दोन वर्षांपूर्वी काँग्रेसला जिल्ह्यात कार्यकर्ते मिळत नव्हते ही वस्तुस्थिती होती . मात्र, आता निश्चितच जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढीस लागला आहे.
आता इच्छुक उमेदवारांची ही संख्या वाढत असल्याने सर्वांना विश्वासात घेत उमेदवारी देण्याचे आव्हान आमच्यासमोर असणार आहे . येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने बांधणी सुरू केली असून ग्रामपंचायत किंवा इतर निवडणुकांसाठी काँग्रेसचे संपर्कमंत्री , नेते लक्ष घालणार आहेत .
महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम या धर्तीवर जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना विविध समित्यामध्ये समप्रमाणात स्थान मिळणार आहे . नोव्हेंबर महिन्यात समन्वय समितीची बैठक घेण्यात आली होती . त्यात विकास कामे किंवा अन्य नियुक्त्यांमध्ये जो काँग्रेसचा वाटा ठरलेला आहे तेवढा देण्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष पालकमंत्री व खासदार विनायक राऊत यांनीही मान्य केले आहे . जिल्ह्यात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज पाटील जिल्ह्यात येणार आहेत असे भोसले यांनी सांगितले .
इर्शाद शेख म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत वाळू दरा संदर्भात बैठक घेण्यात आली . तिथे सकारात्मक निर्णय झाला असून हात पाटीने वाळू काढणारे गरीब लोक आहेत . याकडे महसूल मंत्र्याचे लक्ष वेधले . त्यामुळे सक्शन मशीनचा वापर करून वाळू काढणाऱ्यांचा निकष हात पाटीच्या वाळू उपशाला लावू नये असे दस्तुरखुद्द महसूल मंत्र्यांनी सांगितले आहे.
यावेळी वाळूच्या दराची प्रति ब्रासची रॉयल्टी कमी करा अशी मागणी आम्ही महसूल मंत्र्यांकडे केली . याबाबत महसूल मंत्र्यांनी निर्णय घेतला असून संबधित निर्णयाची अंमलबजावणी व पुढील कार्यवाहीसाठी अर्थ विभागाकडे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .