मिलिंद पारकर ल्ल कणकवलीविधानसभेच्या कणकवली मतदार संघात गेल्या पाच वर्षात अनेक घडामोडी घडल्या. भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांनी गतवेळी अवघ्या ३४ मतांनी येथे विजय मिळविला होता. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप सेनेला वर्चस्व राखता आले नाही. त्यानंतर कणकवली नगरपंचायत निवडणुकीतही काँग्रेसने विजय संपादन केला. त्यामुळे गतविधानसभेचे पारडे बदलले आणि ते काँग्रेसकडे वळले असे वाटत असतानाच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपाचे उमेदवार आणि खासदार विनायक राऊत यांना या मतदार संघातून १३७७ चे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदार कोणाच्या बाजुने कौल देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे आमदार प्रमोद जठार यांच्यासमोर यावेळी काँग्रेसचे तगडे आव्हान असणार आहे. गत विधानसभा निवडणुकीत आमदार प्रमोद जठार आणि काँग्रेसचे पराभूत उमेदवार रवींद्र फाटक यांच्यात अटीतटीची लढाई झाली होती. अवघ्या ३४ मतांनी रवींद्र फाटक पराभूत झाले होते. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असताना राष्ट्रवादीच्या कुलदीप पेडणेकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढताना २४,५६६ मते मिळविली होती. त्यामुळे त्याचा फटका साहजिकच काँग्रेसला बसला होता.त्यानंतर नारायण राणे यांनी भविष्यातील गणिते ओळखून राष्ट्रवादीचे युवा नेते संदेश पारकर यांना काँग्रेसमध्ये घेतले. त्यामुळे कणकवली नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा काँग्रेसने वर्चस्व मिळविले होते. त्यामुळे कणकवली मतदार संघात काँग्रेसचे वरचढ राहणार असल्याचे स्पष्ट होत होते.मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांना (१३७७) चे मताधिक्य मिळाले. त्यामुळे लोकांच्या मनात नेमके काय आहे. याचे विश्लेषण करणे सर्वांनाच अवघड बनले. देशभरात मोदींची लाट होती. त्यामुळे येथेही मोदी फॅक्टर चालला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या मतदार संघातील कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांचे जाळे सर्वांत मजबूत आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर दोन मतदार संघापेक्षा या मतदार संघातून नीलेश राणे यांना चांगली मते मिळाली. ही काँग्रेसच्यादृष्टीने जमेची बाजू म्हणावी लागेल.विधानसभेसाठी जागा वाटप किंवा उमेदवारी जाहीर करणे अद्याप दूर असले तरी विद्यमान आमदार प्रमोद जठार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. त्यांच्याविरोधात कॉँग्रेसकडून गेल्या निवडणुकीत डावलले गेलेले कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, राणे यांच्या वक्तव्यांतून त्यांनी जठार यांच्यासमोर उभे ठाकण्याचे यापूर्वी बोलून दाखवले होते. मागच्या निवडणुकीत कॉँग्रेसमधूनच फाटक यांना विरोध झाला होता. यावेळी सतीश सावंत यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेसचे तळागाळातील कार्यकर्ते जोमाने काम करू शकतात. असा पदाधिकाऱ्यांना मानस आहे. नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सतीश सावंत यांच्या उमेदवारीबाबतचे भाष्य केले होते. त्यामुळे भाजपाकडून प्रबळ दावेदार असलेल्या प्रमोद जठार यांच्याविरोधात आता कोण रिंगणात असणार यावर बरीचशी गणिते अवलंबून राहणार आहेत. खासदार नीलेश राणेंच्या पराभवाने राणेंचे कार्यकर्ते मोठ्या धक्कयातून अद्याप सावरलेले दिसत नाहीत. भविष्यात त्यांना सावरण्यासाठी काँग्रेसला वेगवेगळ्या उपाययोजना राबवाव्या लागतील. तर लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर भाजपा-शिवसेनेतही अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशाच्या श्रेयावरून वाद सुरू झाला.
प्रमोद जठारांसमोर काँग्रेसचे तगडे आव्हान
By admin | Published: June 11, 2014 12:32 AM