रजनीकांत कदम कुडाळ : कनेक्टिंग पीपल असे ब्रीद वाक्य असलेल्या बीएसएनएलची मोबाईल सेवा कुडाळ तालुक्यात सध्या पूर्णपणे कोलमडली असून ग्राहक हैराण झाले आहेत. योग्य सेवा न दिलेल्या कालावधीत ग्राहकांचे झालेले नुकसान बीएसएनएल विभाग भरून देणार का? असा सवाल ग्राहकांतून विचारला जात आहे. कोलडलेल्या सेवेमुळे कंपनीचे ग्राहकही कमी होत असल्याचे चित्र दिसत आहेत.
एकीकडे सरकार डिजिटल भारत बनविण्यासाठी घोषणा करीत आहे, तर दुसरीकडे भारत सरकारचा अधिकृत उपक्रम असलेल्या बीएसएनएल कंपनीची मोबाईल सेवा कोलमडली आहे. गेल्या काही दिवसांपासून कुडाळ शहराबरोबरच तालुक्यातील अनेक गावातील बीएसएनएलच्या मोबाईल सेवेचे तीनतेरा वाजले आहेत.
ग्राहकांनी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास कमीत कमी दहा ते वीस वेळा नंबर डायल केल्यानंतर फोन लागतो. नाहीतर बहुतेक वेळा नॉट रिचेबल, बिझी, एक रिंग वाजून कॉल कट होणे असे प्रकार होत आहेत. या सेवेमुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील बीएसएनलच्या मोबाईल टॉवरची योग्य प्रकारे दुरूस्ती केली जात नसल्याने तसेच अधिकारी वर्गाचे होत असलेले दुर्लक्ष ही बीएसएनएल मोबाईल सेवा कोलमडण्याची प्रमुख कारणे आहेत. या तालुक्यात नवीन टॉवर उभारा, पण त्या अगोदर जुने टॉवर दुरूस्त करा, अशी मागणी ग्राहकांमधून जोर धरू लागली आहे.
इंटरनेट सेवाही डबघाईसतालुक्यातील बीएसएनएलची इंटरनेट सेवाही डबघाईला आली आहे. कुडाळ शहरात काही प्रामाणात इंटरनेट सेवा चांगली असली, तरी ग्रामीण भागात मात्र पूर्णपणे डबघाईला आली असून, अनेक वेळा इंटरनेट सेवा बंदच असल्याचे ग्राहकांनी सांगितले.
नुकसान भरपाई देणार का?बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे ठराविक कालावधीसाठी टॉक टाईम, नेट पॅक घेतलेल्या ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्राहकांच्या होणाºया नुकसानाची बीएसएनएल भरपाई देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वारंवार विस्कळीत होणाºया सेवेबाबत विचारणा केली असता बीएसएनएल कार्यालयाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची तक्रारही आहे.
ग्राहकांच्या संख्येत घट?बीएसएनएल मोबाईल सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असताना खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा मात्र चांगल्या पध्दतीने सुरू असल्याने ग्राहक या कंपन्यांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएल कंपनी विविध योजना जाहीर करते. प्रत्यक्षात मात्र सेवा विस्कळीत असल्यामुळे ग्राहक हैराण झाले असून, तालुक्यात बीएसएनएल ग्राहकांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.