सावंतवाडी : सातार्डा येथील शाळा नं.१ च्या वर्गखोल्याचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असून, आराखड्याप्रमाणे काम झाले नाही, असा आरोप पंचायत समिती सदस्या शुभांगी गोवेकर यांनी पंचायत समिती बैठकीत केला. यावेळी शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांनी पैसे देऊनही जर काम वेळेत झाले नाही तर व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांकडून याची वसुली केली जाईल, असे स्पष्ट केले. सावंतवाडी पंचायत समितीची बैठक सभापती प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती महेश सांरग, गटविकास अधिकारी सुमितकुमार पाटील, शिक्षणअधिकारी रत्नाकर धाकोरकर, उपविभागीय बांधकाम अभियंता अनामिका चव्हाण, सदस्य अशोक दळवी, लाडोबा केरकर, नारायण राणे, स्वप्निल नाईक, प्रियांका गावडे, सुनयना कासकर, गौरी आरोंदेकर, श्वेता कोरगावकर उपस्थित होते. पाणलोट सचिवांना अद्यापपर्यंत त्यांचे मानधन मिळाले नसल्याने सभापती प्रमोद सावंत यांनी कृषी अधिकारी काका परब यांना धारेवर धरले. जर मानधनच दिले जात नाही. मग झालेल्या कामाचा व्हॅट कशासाठी मागता, असा सवाल यावेळी केला. पाणलोट सचिव व्हॅट भरणार नाही, असे यावेळी सावंत यांनी स्पष्ट केले. सदस्या वर्षा हरमलकर यांनी मळगाव येथील ग्रामसेवक योग्य पद्धतीने काम करीत नाहीत, अशी तक्रार दिली. त्यावर सभापती यांनी या ग्रामसेवकाकडून खुलासा मागवण्याचे आदेश दिले आहेत. सातार्डा येथील शाळा नं. १ साठी वर्गखोल्या बांधण्यासाठी निधी प्राप्त झाला, पण काम मंद सुरू आहे. तसेच आराखड्याप्रमाणे काम होत नाही, अशी तक्रार सदस्या शुभांगी गोवेकर यांनी केली. यावर शिक्षणअधिकारी रत्नाकर धाकोरकर यांनी कामाबाबत शिक्षण समितीच्या बैठकीत विषय झाला असून, मध्यंतरी निधी नव्हता, पण आता निधी देण्यात आला आहे, असे असतानाही काम करण्यात टाळाटाळ होत असेल, तर शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांकडून रक्कम वसूल करण्यात येईल. तसेच आराखडा बदलण्यात आला आहे. याबाबत खात्री करण्यात येणार असून त्यानंतर कारवाई करू असे यावेळी धाकोरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी कारिवडे रस्त्यावर चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)
वर्गखोल्यांचे बांधकाम आराखड्याप्रमाणे नाही
By admin | Published: January 16, 2016 11:29 PM