नीलेश मोरजकर-बांदा शहराच्या गतवैभवाची साक्ष देणाऱ्या सोळाव्या शतकातील आदिलशाही राजवटीतील ‘रेडेघुमट’ या वास्तूवर वाढलेल्या झाडवेलींच्या साफसफाईची मोहीम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतल्याने या वास्तूला झळाळी प्राप्त झाली आहे. येथील वक्रतुंड कला-क्रीडा युवक मंडळाने या वास्तूची काही वर्षांपूर्वी श्रमदानातून साफसफाई केली होती. पर्यटन खात्याकडे या वास्तूच्या विकासासाठी निधीची मागणी करण्यात आली असून निधी मिळाल्यानंतर या वास्तूच्या जतनासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता ए. एन. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या वास्तूच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठविला होता. बांदा ग्रामपंचायतीने या वास्तूवरील झाडवेलींची साफसफाई करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र दिले होते. गेले काही दिवस सुरु असलेल्या या मोहिमेने या वास्तूवरील झाडवेलींचा विळखा दूर करण्यात आल्याने या वास्तूला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. ‘रेडेघुमट’च्या विकासासाठी पर्यटन विकास खात्याने पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे; मात्र निधी नसल्याचे कारण देत या वास्तूच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.बांदा हे ऐतिहासिक शहर आहे. याठिकाणी इतिहासकालीन इमारतींचे अवशेष आजही पहावयास मिळतात. मात्र, याठिकाणी असलेली कित्येक ऐतिहासिक स्थळे काळाच्या ओघात नष्ट झाली आहेत. बांदा शहराच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू लोप पावण्याच्या मार्गावर असून त्यात रेडेघुमटचाही समावेश आहे. पर्यटन खात्याने तसेच प्रशासनाने या वास्तूच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने पाच वर्षांपूर्वी येथील वक्रतुंड कला-क्रीडा युवक मंडळाने या वास्तूची पूर्णपणे साफसफाई करुन तिच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला.भारतीय पुरातत्व खात्याने या वास्तूची पाहणी केली होती. तर पर्यटन विकास महामंडळाने विकासासाठी कोकण पॅकेजमधून पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, अद्यापपर्यंत निधी खर्ची करण्यात न आल्याने या वास्तूवर पुन्हा झाडवेलींचा विळखा पडला होता.बांदा ग्रामपंचायतीने या वास्तूच्या जतनासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला साफसफाई करून देण्याची विनंती पत्राद्वारे केली होती. त्यानुसार या वास्तूवरील झाडवेलींची साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली. या वास्तूवर मोठ्या प्रमाणात जंगली झाडांची वाढ झाली असून झाडांची मूळे भिंतीत खोलवर गेलेली आहेत. त्यामुळे या जंगली झाडांना मुळापासून उखडून टाकण्यासाठी कोल्हापूर येथून खास यंत्रणा मागविण्यात येणार आहे. तसेच या वास्तूच्या कायमस्वरुपी जतनासाठी पर्यटन विकास महामंडळाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधीची मागणी करण्यात येणार आहे.रेडेघुमट-सोळाव्या शतकातील ऐेतिहासिक वास्तुबांदा शहराची शान असलेल्या रेडेघुमटची उभारणी सोळाव्या शतकात आदिलशाही राजवटीत आदिलशहाचा सुभेदार पिरखान याने केली होती. या वास्तूची उंची ही १२0 फूट आहे. या वास्तूला चबुतरे असून ही वास्तू भव्यदिव्य आहे. ही वास्तु म्हणजे वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. घुमटाच्या प्रवेशद्वारावरील दरवाजावर कोरीव काम करण्यात आले आहे. बाजूला घोड्यांना बांधण्यासाठी चबुतरे असून बारमाही पाणी असलेली तळी बांधण्यात आली आहे. या तळीचा वापर शहरवासियांना पाणी पुरवठा करण्यासाठीही केला जाऊ शकतो. मात्र, यासाठी तळीच्या स्त्रोतांची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. शहरातील इतर ऐेतिहासिक वास्तू काळाच्या ओघात नष्ट झाल्या असून त्यांचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. यातील ‘बैलघुमट’ ही वास्तू पूर्णपणे नष्ट झाली आहे. केवळ ‘रेडेघुमट’ ही वास्तू अजूनही अस्तित्वात आहे.
बांधकाम खात्याला आली जाग
By admin | Published: March 24, 2015 9:08 PM