संदीप बोडवे मालवण: किल्ले राजकोट परिसर नूतनीकरण व सुशोभीकरण काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच याठिकाणी उभारणी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीच्या कामास प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. २५ नोव्हेंबर पर्यत पुतळा उभारणी तसेच सर्व कामे पूर्ण होतील. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.किल्ले राजकोट परिसर सुशोभीकरण काम तसेच त्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच आहे. पुतळा बसवण्यात येणारे बांधकाम जमिनीपासून १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी होत आहे. पुतळ्याची जोडणी करून प्रत्यक्ष जागी उभारणी कामास सुरवात झाली आहे. अतिशय नियोजनबद्ध, गतिशील कामसंपूर्ण परिसराला किल्ल्याचे स्वरूप देण्यात आले आहे. 'राजकोट' नावाने भव्य प्रवेशद्वार उभराणी अंतिम टप्यात आहे. वीज पुरवठा जोडणीही करण्यात आली आहे. नौसेना, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेख खाली अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने गतिशील पणे काम सुरु आहे. पुतळा उभराणी, प्रवेशद्वार व अन्य कामे पूर्ण करून संपूर्ण वास्तू २५ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल असे नियोजन आहे.भविष्यात पर्यटकांची गर्दी वाढेलनौसेना दिन निमित्ताने ४ डिसेंबर रोजी मालवण येथे येत असलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर होईल. त्यानंतर निश्चितच याठिकाणी पर्यटकांची गर्दी अधिक वाढणार आहे. किल्ले सिंधुदुर्ग सोबत किल्ले राजकोट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. मालवणच्या बारमाही पर्यटनात किल्ले राजकोट व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महत्वाचे केंद्र ठरेल. असा विश्वास नागरिक तसेच पर्यटन उद्योग क्षेत्रातुन व्यक्त केला जात आहे. मालवण येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्याही भविष्यात निश्चितच मोठ्या प्रमाणात वाढेल असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.
किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी कामास प्रत्यक्ष सुरवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 12:29 PM