सिंधुदुर्ग: जिल्ह्यात मंगळवारी सकाळच्या सत्रात उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा सायंकाळपासून दमदार पुनरागमन केले. मंगळवारी रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी दिवसभर पावसाच्या अधूनमधून संततधार सरी कोसळत होत्या. त्यामुळे नदी, नाले, ओहोळांना पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसाने हरकुळ येथील धरण भरून ओंसडून वाहू लागले आहे.सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत असलेल्या हरकुळ धरणाचे विहंगम दृष्य ड्रोन कॅमेऱ्यातून आणखीनच खूलुन दिसत आहे. हवामान विभागाने बजावलेल्या आँरेज अलर्ट प्रमाणे पाऊस कोसळत होता. मात्र, जिल्ह्यातील सर्व शाळा नेहमीप्रमाणे भरल्या होत्या.जिल्ह्यात गेल्या चाेवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक ८४.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ६५.४ मिमी पाऊस झाला असून एकूण सरासरी १९८७.३ मिमी पाऊस झाला आहे. सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक २३९३.२ तर त्याखालोखाल दोडामार्ग तालुक्यात २३५२.१ मिलीमीटर तर सर्वात कमी पाऊस देवगड तालुक्यात १६४६.५ झाला आहे.
तिलारी धरण ८६ टक्के भरलेजिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये साधारणपणे ७२ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा झाला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये ३८७.३२६ दलघमी पाणीसाठा असून धरण ८६.५८ टक्के भरले आहे.
नद्यांच्या पाणी पातळीत वाढजिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून तिलारी नदीची पाणीपातळी ४०.५०० मीटर, कर्ली नदीची पातळी ६.५०० मीटर, वाघोटन नदीची पातळी ४.७००, गडनदीची पातळी ३५.५०० मीटर, तेरेखोल नदीची पाणी पातळी ३.५०० मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.