रत्नागिरी : तालुक्यात सलग दोन दिवस झालेल्या खुनांचे कोडे उलगडले आहे. अभिजित पाटणकर खून प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. कोळंबेतील प्रकरणात बापानेच मुलाचा निर्घृण खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी सूर्यकांत लक्ष्मण आंब्रे (४५, कोळंबे ) याला पूर्णगड पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरी शहरातील सन्मित्रनगर येथे राहणाऱ्या अभिजित शिवाजी पाटणकर (वय-२७) याच्यावर चार गोळ्या झाडून त्याचा मृतदेह कारवांचीवाडी-पोमेंडी येथील रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या कडेला गटारात टाकल्याचे गेल्या रविवारी उघडकीस आले होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने अतिशय कुशलतेने या प्रकरणाचा तपास केल्याने या तिघांना पकडण्यात यश आले आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतूनच हा खून झाल्याचे तपासात पुढे येत आहे. अभिजीत खूनप्रकरणी ताब्यात घेतलेल्या तीन संशयितांची नावे जाहीर करण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली. या खुनाचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने चमकदार कामगिरी केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या तपासात प्रथम दोघांना ताब्यात घेण्यात आले. हे दोघे कोकणनगर भागातील असल्याची चर्चा आहे. तिसऱ्या संशयितास रत्नागिरीपासून ८० किलोमीटरवरील एका ठिकाणी पकडण्यात आले आहे. अभिजीत पाटणकर खून प्रकरणाचा छडा लागला असून आता यातील सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. गोळ्या कोणी झाडल्या याचेही धागेदोरे पोलिसांच्या हाती आल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील कोळंबे येथे सोमवारी (३१ आॅगस्ट) उघडकीस आलेल्या प्रकरणात सूर्यकांत लक्ष्मण आंब्रे यानेच आपला मुलगा सतीश याचा धारदार हत्याराने खून केल्याचे उघड झाले आहे. त्याला आज मंगळवारी दुपारी अटक करून न्यायालयात हजर केले असता ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)अभिजित प्रकरणात आणखी आरोपी?शनिवारी सायंकाळी घरातून निघून गेल्यानंतर न परतलेल्या अभिजितचा गोळ्या झाडलेल्या स्थितीतील मृतदेह सापडला. त्या प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून पुढील तपास सुरूच आहे. या आर्थिक देवाण घेवाणीच्या व्यवहारात आणखी काही संशयित असण्याची शक्यता असल्यानेच पकडलेल्या आरोपींची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
ठेकेदार खूनप्रकरणी तिघेजण ताब्यात
By admin | Published: September 01, 2015 9:46 PM