कणकवली : जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी कामे दिली. हे कार्यकर्ते ठेकेदार होऊन नेते बनले; परंतु ही ठेकेदारीच आमच्या मुळावर आली. यापुढे ठेकेदारांना स्थानिक स्वराज्य संस्थांची उमेदवारी मिळणार नाही. पक्षाच्या विरोधात पत्रकबाजी करणाऱ्यांवर कारवाई होणार, असा इशारा पालकमंत्री नारायण राणे यांनी कॉँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी सभेत दिल्याचे समजते. नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत स्वपक्षीयांवर केलेल्या टीकेनंतर नारायण राणे यांच्या उपस्थितीत आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. ओसरगाव येथे महिला भवनात आयोजित या सभेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, माजी आमदार राजन तेली, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, विकास सावंत, कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, वसंत केसरकर, जयेंद्र परुळेकर यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभेत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नीतेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आणि पक्षविरोधी कारस्थाने करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली. राजन तेली यांनी नीतेश राणे यांच्या वक्तव्याचा प्रतिवाद केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच ठेकेदारी, टक्केवारी, जमीन खरेदीबाबत झालेल्या आरोपांबाबत समिती स्थापन करून चौकशी करावी. जेणेकरून खरी नावे समोर येतील, असा बचाव करण्याचाप्रयत्न केला. सतीश सावंत यांनी आतापर्यंतच्या राजकारणात आम्ही ठेकेदारीत टक्केवारी केली नाही. त्यामुळे नीतेश राणेंच्या टीकेला उत्तर दिले नाही. यापुढेही पद राहिले किंवा नाही तरी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असे सांगितले. गेली २५ वर्षे ज्यांना मी घडविले तेच माझ्या मुलावर उलटले. कंपनीत मिळणाऱ्या पगारापेक्षा तुमच्याजवळ एवढी संपत्ती कुठून आली असती? पाठीमागून वार करू नका. पक्षविरोधी बातम्या पसरवणाऱ्यांना कॉँग्रेसमध्ये स्थान नाही. नीतेश राणे असतील किंवा कोणीही यापुढे असे वाद चव्हाट्यावर येऊ देऊ नका. पक्ष सोडून कोण कुठे जाण्याचा प्रयत्न करतो हे मला लगेच समजते. राज्यस्तरावर सर्व पक्षात माझे मित्र आहेत. सोशल आणि इतर मीडियामधील बदनामी थांबवा. लोकांमध्ये जा. चांगल्या प्रकारे कामे करून प्रतिमा सुधारा. सुडाचे राजकारण सोडून विधानसभेसाठी जोमाने काम करा, असे राणे यांनी सांगितले.कारवाई होणारच पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आणून कॉँग्रेसला बदनाम केल्याबद्दल संबंधितांवर कारवाई होणार असल्याचा इशारा राणे यांनी दिला. सभेत सर्वांच्या टीकेचे लक्ष तेली, पडते, कुडाळकर हे राहिले. यापैकी कुडाळकर आणि पडते अनुपस्थित होते. तेली यांच्यावरील तीव्र नाराजी राणे यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली. नीलेश, नीतेश हे सक्षम नेतृत्व नाही का? असे विचारून यापुढे तुम्ही सांगाल त्यांना उमेदवारी देऊ. मागील विधानसभेत सतीश सावंत यांनी नीतेश राणे यांना उमेदवारी देण्यास सांगितले असतानाही रवींद्र फाटक यांना संधी दिली. अनेक मराठा कार्यकर्ते असताना राजन तेली यांना जिल्हा परिषदेत संधी दिली. एवढे करूनही आम्हाला कृतघ्न वागणूक मिळाली. (प्रतिनिधी)
ठेकेदारांना यापुढे उमेदवारी नाही : राणे
By admin | Published: July 08, 2014 11:25 PM