मालवण : मालवणातील प्रभारी मत्स्य आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून वादग्रस्त ठरलेल्या प्रदीप वस्त यांची अखेर आमदार वैभव नाईक यांनी मच्छिमारांना दिलेल्या शब्दानुसार पदावरून उचलबांगडी केली.
सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त म्हणून श्रीकांत वारुंजीकर यांनी पदभार स्वीकारावा असे पत्र राज्य मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी वारुंजीकर यांना पाठविल्यानुसार वारुंजीकर यांनी या पदाचा पदभार स्वीकारला.
मत्स्य विभागाचे मत्स्य आयुक्त गोविंद बोडके यांनी वस्त यांच्याकडून पदभार काढून घेत त्यांच्या जागी परवाना अधिकारी असलेल्या श्रीकांत वारुंजीकर यांच्या नियुक्तीचे आदेश देत तत्काळ पदभार घेण्याचे सूचित केले. याबाबत आमदार नाईक यांनी मंत्रालयात आयुक्तांंशी चर्चा करून आदेश काढण्यास भाग पाडले.मत्स्य व्यवसाय कार्यालयात प्रशिक्षण अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या प्रदीप वस्त यांच्याकडे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. मात्र, वस्त यांच्याकडून समाधानकारक काम केले जात नसल्याचा आरोप मच्छिमारांकडून करण्यात येत होता.
पर्ससीनची अवैधरित्या मासेमारी होत असताना त्यांच्यावर कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार नीतेश राणे यांनी छेडलेल्या आंदोलनात त्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले होते. मत्स्य व्यवसाय विभागाकडून सातत्याने अवैधरित्या होणाऱ्या मासेमारी कारवाईची मागणी करूनही वस्त यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मच्छिमारांनी सर्वपक्षीय मेळाव्यात केला होता.
आमदार वैभव नाईक यांनी वस्त यांची महिनाभरात हकालपट्टी करण्यात येईल, असे आश्वासन मच्छिमारांना दिले होते. यासंदर्भात आमदार नाईक यांनी राज्य मत्स्य आयुक्तांचे लक्ष वेधल्यानंतर आज प्रदीप वस्त यांचा कार्यभार काढून घेण्यात आला.