कणकवली : कोकणातील प्रसिद्ध मेवा, खास मसाले तसेच कलाकृतींबरोबरच कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना सर्वदूर पोहचविण्यासाठी आकाश आवटे, अमित आवटे, हरिष गणपत्ये, सुनील निल्ले यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. ‘कोकण ई-मार्केट प्रा. लि.’ या कंपनीची त्यांनी स्थापना करून स्वतंत्र वेबसाईटच्या माध्यमातून कोकणातील उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रभर घरोघरी पोहचविण्याचा त्यांचा मानस आहे.देशभरातल्या मार्केटिंग क्षेत्रात सध्या ई-मार्केटिंगचा चांगला दबदबा निर्माण झाला आहे. अनेक ई-मार्केटिंग कंपन्या एकाचवेळी अनेक उत्पादने घेऊन या क्षेत्रात कार्यरत आहेत. एखाद्या विशिष्ट भागातील उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी स्वतंत्र कंपनी असली तर त्या भागातील उत्पादनांना चांगला न्याय मिळू शकतो. यासाठीच कोकण ई-मार्केट प्रा. लि. या कंपनीची स्थापना करण्यात आल्याचे अमित आवटे यांनी सांगितले. कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांच्या विक्रीसाठी कंपनीकडून ६६६.‘ङ्म‘ंल्लें१‘ी३.ूङ्मे ही वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. या वेबसाईटचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ सप्टेंबर रोजी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर केले. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते.या कंपनीचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर अभिनेते भाऊ कदम हे आहेत. तर कोकणातील आंबा, काजू, कोकण तडका, कोकण मिठास, कोकण चटपटा, कोकण दालन, कोकण गावरान आदी ब्रँडच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील खवय्यांना कोकणी पदार्थांची चव चाखता येणार आहे. विविध लोणची, मुरांबा, मालवणी ठेचा ही या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर सावंतवाडीची लाकडी खेळणी, जागतिक कीर्तीचे चित्रकार अरुण दाभोळकर यांच्या चित्रकृती, लाकडाचे तसेच बांबूचे दर्जेदार फर्निचर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कुरियर सेवा तसेच पोस्टाच्या माध्यमातून घरपोच सेवा देण्यात येणार आहे. कोकणातील पदार्थांच्या विक्रीसाठी ई-मार्केटिंगचा वापर करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे कोकण ई- मार्केट प्रा. लि. कंपनीचे संचालक अमित आवटे, आकाश आवटे, हरीश गणपत्ये यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
कोकणी उत्पादने घरबसल्या मिळण्याची सोय
By admin | Published: September 17, 2016 11:32 PM