कणकवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जीवनात देश हितासाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण असेच आहे. ते योगदान एका चित्र प्रदर्शनातून मांडणे कठीण आहे. पंतप्रधानांचे अनमोल कार्य व विचार आमदार नितेश राणे यांनी पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध करून सामान्य जनतेपर्यत पोहोचवावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथे केले.कणकवली येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा जीवनपट चित्र प्रदर्शनाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज, शुक्रवारी करण्यात आला. या चित्र प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जीवनाच्या वाटचालीत घेतलेले यशस्वी निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.यावेळी निलमताई राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर.जे.पवार, नगराध्यक्ष समीर नलावडे आदिसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मंत्री राणे म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे सर्व मंत्री, पदाधिकारी व कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सेवा पंधरावडा साजरा करीत आहेत. जनतेच्या हिताचे निर्णय लोकांपर्यत पोहचवले जात आहेत. आमदार नितेश राणे यांनी आयोजित केलेले हे जीवनपट चित्र प्रदर्शन हा एक चांगला उपक्रम आहे असे कौतुक राणे यांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार जनतेपर्यंत पोहचवा - केंद्रीय मंत्री नारायण राणे
By सुधीर राणे | Published: September 30, 2022 5:31 PM