वैभववाडी : स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यानुसार ३१ मार्चपूर्वी प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. शौचालय उभारण्याच्या प्रक्रियेत प्रशासकीय अडचणी येत असतील तर माझ्याकडे तक्रार करा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी आज नाधवडे व करुळ येथील बैठकीत नागरिकांना सांगितले.स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी नाधवडे आणि करुळ ग्रामपंचायतीत बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, सभापती शुभांगी पवार, उपसभापती बंड्या मांजरेकर, गटविकास अधिकारी सदानंद पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता चोरगे, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, शोभा सुतार, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिणगारे, विस्तार अधिकारी हांडे, नाधवडे सरपंच दादा पावसकर, करुळ सरपंच रमेश सुतार, उपसरपंच भय्या कदम आदी उपस्थित होते.स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्यातील १२ गावे पिछाडीवर असून, त्यापैकी ५ गावे ही वैभववाडी तालुक्यात आहेत. सन २०१२च्या सर्वेक्षणानुसार पात्र लाभार्थ्यांना शौचालयासाठी शासन १२ हजार रुपये अनुदान देत आहे. त्यामुळे नागरिकांनी या अनुदानाचा लाभ घेऊन अभियानाच्या १०० टक्के यशस्वीतेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे. यामध्ये ग्रामसेवक किंवा कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसेल तर थेट माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दोन्ही गावातील ग्रामस्थांना केले. (प्रतिनिधी)करुळ केगदवाडीवर कुटुंबांच्या तुलनेत शौचालयांची संख्या कमी आहे. याचे मुख्य कारण रस्त्याअभावी बांधकाम साहित्याची न परवडणारी वाहतूक हेच आहे. त्यामुळे शौचालयाच्या अनुदानाखेरीज विशेष बाब म्हणून वाहतूक खचार्साठी अतिरिक्त अनुदान देण्याचे आश्वासन दिले व शौचालय बांधून शंभर टक्के अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन शेखर सिंह यांनी केगदवाडीच्या रहिवाशांना केले.वीज, रस्ता व पाणी या मुलभूत सुविधांपासून पाच पिढ्या वंचित असलेल्या करुळ केगदवाडी या धनगर वस्तीवर जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी तेथील रहिवाशांच्या समस्या ऐकल्या. यावेळी तेथील वयोवृद्धांनी मुलभूत सोयी सुविधांअभावी होत असलेल्या हालअपेष्टांचा पाढा वाचला. त्यावेळी मी तुमच्या भावनांचा आदर करतो. मात्र, तुम्हाला आत्ता कोणतेही आश्वासन देऊ शकणार नाही. परंतु, तुमच्या समस्यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करेन, असे सिंह यांनी केगदवाडीच्या रहिवाशांना सांगितले. करुळच्या केगदवाडी या धनगर वस्तीवर पोहोचणारे शेखर सिंह हे पहिले आयएएस अधिकारी ठरले.
जिल्हा हागणदारीमुक्तीसाठी सहकार्य करा
By admin | Published: February 12, 2016 11:04 PM