गुहागर : विविध राजकीय पक्षांचे नेते, अभिनेते यांचा आवाज व नक्कल कुत्रा, मांजर, कोकिळा, कावळा यांचे विविध शैलीतील आवाज, आकड्याच्या उजळणीवर चित्र रेखाटणे, विनोदी कविता, गाणी सादर करुन राजापूर येथील विनोदी नकलाकार वसंत ठाकूर यांनी गुहागरमधील प्रेक्षकांना खिळवून ठेवले.विनोदी कलाकार म्हणून आपली कशी सुरुवात झाली हे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितले. घरचे वातावरण शिस्तीचे असल्याने नाक्यावर कार्यक्रमात राहून विनोद करणे हे कुटुुंबियांना पसंत नव्हते. तरीही या क्षेत्रात आवड म्हणून टिकून राहिलो. गेल्या ३५ वर्षात तब्बल साडेतीन फूट नखे वाढवली, याची जागतिक स्तरावर नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष्यांमध्ये कावळा, कोकिळा व कुत्र्याचा आवाज विविध पद्धतीने काढत प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद मिळवला. मुंबईमधील प्लॅटफॉर्मवरील लोकल ट्रेन, कोकणातून जाणारी रेल्वे अशा विविध धाटणीवर वेगळ्या पद्धतीने रेल्वेचे आवाज काढले. शिटीच्या तालावर मेरे वतन के लोगो व राष्ट्रगीत सादर केले. स्टेजवर लहान मुलांना १ ते ५० आकडे म्हणायला सांगून तेवढ्या वेळात साईबाबांचे चित्र रेखाटले.अखेरच्या टप्प्यात आपली साडेतीन फूट वाढवलेली नखे प्रेक्षकांसमोर दाखवल्यानंतर ही नखे जवळून पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी एकच गर्दी जमली. लहान बाळाप्रमाणे ही नखे आपण जपत असून, खूप वेदना व खर्चिक पद्धतीने याचे जतन करत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नकलाकाराने गुहागरकरांना जिंकले
By admin | Published: March 14, 2016 8:52 PM