ओरोस : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजमध्ये शासकीय दरात कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने सर्व परवानगी दिली असून कोरोना बाधित व निगेटिव्ह हे दोन्ही अहवाल मिळणार आहेत. ट्रूनॅट मशीनद्वारे ही तपासणी करण्यात येणार आहे.
येथे कोरोना बाधित अहवाल आल्यास पुन्हा मोठ्या कोरोना तपासणी केंद्रात तपासणी करण्याची गरज नाही. यामुळे ज्यांंना कोरोना तपासणी करायची आहे, पण निकषामुळे शासकीय यंत्रणा ही तपासणी करून शकत नाही. त्यांना येथे सुविधा उपलब्ध झाली आहे. अवघ्या दीड तासात याचा अहवाल मिळणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.आमदार राणे यांच्या हस्ते फित कापून या सुविधेचा शुभारंभ झाला. यापूर्वी राणे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यावेळी रुग्णालयाचे डीन डॉ. आर. एस. कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा पडते, डॉ. मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. जिल्ह्यात प्रथमच एखाद्या खासगी दवाखान्यात अशाप्रकारे सुविधा उपलब्ध होत आहे. भाजप आमदारांनी दिलेल्या निधीतून कोरोना तपासणीचे मोठे केंद्र लवकरच सुरू होत आहे. मात्र, आमची जिल्हा रुग्णालयाशी स्पर्धा सुरू नाही. तर जिल्ह्यात अशाप्रकारे आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, असा आमचा प्रयत्न आहे, असेही यावेळी आमदार राणे यांनी सांगितले.यावेळी राणे यांनी, हे तपासणी केंद्र आयसीएमआर यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी होणार आहे. यासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. ही अत्याधुनिक मशीन आहे. अन्य ट्रूनॅट मशीनद्वारे केलेल्या तपासणीत बाधित आलेल्या व्यक्तीचा नमुना पुन्हा तपासणीसाठी मोठ्या तपासणी केंद्रात पाठवावे लागत आहे. मात्र, येथे तशी गरज नसून कोरोना बाधित आलेला अहवाल येथेच दुसऱ्या किटमध्ये तपासण्यात येणार आहे. त्यातही बाधित आल्यास ती व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निश्चित होणार आहे. तसेच एखाद्याचा अहवाल हरविल्यास तो पुन्हा नमुना न घेता मिळणार आहे. कारण यात २० हजार नमुने साठवण्याची क्षमता आहे. शासकीय दरानुसार २८०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे, असेही राणे यांनी सांगितले.