सुधीर राणेकणकवली : कोकणातील महत्वपूर्ण अशा मालवण तालुक्यातील आंगणेवाडी व देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील यात्रा आहेत. या यात्रांसाठी दरवर्षी एसटीचासिंधुदुर्ग विभाग विशेष नियोजन करीत असतो. या उत्सवाअंतर्गत भाविकांची सोय व्हावी म्हणून जादा गाड्या सोडल्या जातात. त्यातून दरवर्षी सुमारे ५० लाखांचे उत्पन्न मिळत असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे या दोन्ही यात्रा प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्याने त्याचा फटका एसटीला बसला आहे.गतवर्षी एस.टी.प्रशासनाने आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी जादा १२५ तर कुणकेश्वर यात्रेसाठी ८० अशा २०५ जादा गाड्या सोडल्या होत्या. त्यातून चांगले उत्पन्न मिळाले होते. तर सन २०१९ मध्ये आंगणेवाडी यात्रेसाठी १०६ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामाध्यमातून ९० हजार प्रवाश्यांची वाहतूक करण्यात आली होती. त्यातून एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला २४ लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळाले होते.
कुणकेश्वर यात्रेसाठी गतवर्षी ७० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या गाडयामंधुन ६० हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने एस.टी.महामंडळाला २२ लाखाचे उत्पन्न मिळाले होते. फक्त या दोन यात्रांच्या माध्यमातून ४६ लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळाले होते. तसेच हिरण्यकेशी, नेरूर यासह अन्य ठिकाणी असलेल्या महाशिवरात्रीच्या यात्रेतूनही एसटीला उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे यात्रांच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नाचा आकडा ५० लाखांवर गेला होता.सन २०२० मध्येही यात्रेतून मिळालेल्या एसटीच्या उत्पन्नाचे प्रमाण काहीसे असेच होते. मात्र, यावर्षी यासर्व उत्पन्नाला एसटीला मुकावे लागले आहे. आर्थिक दृष्ट्या तोट्यात असलेल्या एसटीला विविध माध्यमातून कोरोनाचा फटका बसत आहे. त्यातच यावर्षी सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची भराडी देवीची यात्रा फक्त आंगणे कुटुंबियांसाठीच खुली ठेवण्यात आली होती. तर कुणकेश्वर यात्राही प्रशासनाने रद्द केली होती. त्याठिकाणी दरवर्षी प्रमाणे धार्मिक कार्यक्रम झाले . मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना तेथील देवतांचे दर्शन घेता आले नाही. त्याचबरोबर यात्रेला दर्शनासाठी गर्दी होणार नसल्याने एसटीने जादा गाड्यांची सोय केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.व्यावसायिकांनाही फटका !यात्रेच्या निमित्ताने विविध खाद्य पदार्थ तसेच साहित्याची विक्री करणारी दुकाने त्या परिसरात थाटली जातात. मात्र, यावर्षी जत्राच भरणार नसल्याने अनेक व्यावसायिकांनी तिथे दुकाने लावली नाहीत. याठिकाणी यात्रा काळात चांगला व्यवसाय होत असतो. मात्र, यावर्षी त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाला व्यवसायिकांना मुकावे लागले आहे.