सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंट जेएन १ चा पहिला रूग्ण आढळून आल्याचे बुधवारी आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. हा रूग्ण गोवा येथे उपचार घेत होता आणि त्याठिकाणीच त्याची चाचणी बाधित आल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, तो मुळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होता. हा रूग्ण दोडामार्ग तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. मात्र हा रूग्ण आता पूर्णपणे बरा असून कुणीही घाबरून जावू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.दाेडामार्ग तालुक्यातील एका ४१ वर्षीय पुरूषाला २० नोव्हेंबर २०२३ रोजी गोवा येथे उपचारादरम्यान त्याची कोरोनाची चाचणी बाधित आली. तो कोरोनाच्या नव्या जेएन १ या प्रकारात बाधित आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाली होती. मात्र, या चाचणीला आता एक महिना होऊन गेला असून तो रूग्णही पूर्णपणे बरा झाला आहे.तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये, मात्र आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Sindhudurg: कोरोना जेएन १ संशयित 'तो' रूग्ण पूर्णपणे बरा, आरोग्य यंत्रणा झाली सतर्क
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 21, 2023 12:17 PM