संदेश देसाई दोडामार्ग : कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूने रौद्र रूप धारण केले असून त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. हे ओढवलेले संकट निवारणासाठी संपूर्ण देश एक झाला आहे. या रोगाने देशातील मजूर, गोरगरीब कामगार देशोधडीला लागला आहे. ना काम, ना धंदा, ना रोकड, ना पैसाह्ण यामुळे परिणामी उपासमारी ओढवत असताना किराणा व्यापाऱ्यांची मात्र चांदी होताना आढळून येते. कारण हे व्यापारी मालाचे भाव वाढवित असल्याचे चित्र बाजारपेठेत पहायला मिळत आहे.कोणत्याही किराणा दुकानात वस्तंूच्या दरात समतोल नसल्याने गोरगरिबांची लूटमार व्यापाऱ्यांकडून चालू आहे. कोरोना संकट व होणारी आर्थिक लूटमार यामुळे गरीब देशोधडीला लागण्यास वेळ लागणार नाही. हे दृश्य पाहता ह्यकोरोना विषाणूह्णपेक्षा व्यापारी कोरोना घातक ठरत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.कोरोना विषाणू हे नाव ऐकल्यावर थरकाप उडतो. मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणूने शिरकाव केला. बाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा आदेश दिला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी करून १४४ कलम लागू केले. प्रथमत: देशातील नागरिक महत्त्वाचा, त्यानंतर पैसा अशी स्पष्ट भावना त्यांनी जगासमोर दाखवून दिली. मात्र, लॉकडाऊनमुळे जनतेवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी काही निर्बंध लादले.तालुका बाजारपेठ ते शहरी बाजारपेठ नियमावली घालून दिली. सोशल डिस्टन्सिंग प्रत्येक व्यक्तीने १ मीटर अंतर ठेवूनच दुकानासमोर उभे राहणे अशा सूचना देण्यात आल्या. काही ठिकाणी डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. मात्र काही ठिकाणी त्याची पायमल्ली झाली, हे दुर्दैव आहे.लॉकडाऊननंतर काही दिवसांत राज्यात कोरोना सदृश रुग्ण वाढू लागले. त्यामुळे जिल्हा सीमा सील करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. परिणामी तालुक्याच्या ठिकाणी होणारी जीवनावश्यक माल वाहतूक ठप्प झाली. मात्र याचा फायदा व्यापाऱ्यांनी पुरेपूर उचलला.अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे इतर वाहतुकी बरोबरच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक ठप्प झाली.
परिणामी २१ दिवसांचा लॉकडाऊन समजताच अन्नधान्याचा तुटवडा होणार या भीतीने नागरिकांनी बाजारपेठेवर गर्दी केली. ग्रामीण भागात आठवड्यातून एक दिवस भरणाऱ्या बाजारपेठेत नागरिकांच्या दर दिवशी दुकानासमोर रांगा लागल्या.
संचारबंदीमुळे फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू राहतील या आदेशानुसार किराणा, भाजीपाला, दूध आदी दुकाने सुरू ठेवण्यात आली. मात्र, किराणामाल व्यापाऱ्यांकडून हळूहळू दरात वाढ होऊ लागली. बाजारपेठेत एकापेक्षा अनेक किराणा मालाची दुकाने आहेत. प्रत्येक दुकानात वस्तूंच्या दरात समतोल नसल्याचे चित्र उघड होऊ लागले. काही व्यापाऱ्यांनी तर चक्क कित्येकपटीने चढे दर आकारून लुटमार चालू केली आहे. परंतु गोरगरीब जनतेला नाईलाजास्तव खरेदी करणे भाग पडत आहे.
नागरिकांची ही एक प्रकारची लूटमार व्यापाऱ्यांनी चालवली आहे. आणीबाणीच्या स्थितीत होणारी गोरगरीब जनतेची आर्थिक लुटमार लक्षात घेता प्रशासनाने असे प्रकार करणाऱ्या व्यक्तींवर सक्त कारवाईची मागणी होत आहे. यापूर्वी अनेक प्रसंगात व्यापाऱ्यांनी जनतेला वेगवेगळ्या प्रकारची मदत केली आहे. आताही तशाच प्रकारच्या मदतीची अपेक्षा जनतेला आहे.निश्चित दरफलक लावणे सक्तीचे; व्यापारी संघटनेने लक्ष देण्याची गरजकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू ठेवण्यात आली आहेत. परंतु प्रत्येक दुकानात जीवनावश्यक वस्तूंचे दर वेगवेगळे आहेत. यांच्यात तफावत असल्याचे गरीब जनतेच्या निदर्शनास येत आहे. यासाठी प्रशासनाने प्रत्येक किराणा दुकानाच्या समोर वस्तूंचे दरपत्रक लावणे सक्तीचे करणे आवश्यक आहे.तालुक्यात प्रत्येक बाजारपेठेत व्यापारी संघटना स्थापन केली आहे. या संघटनेचे अध्यक्ष व सदस्य या व्यापारी वर्गातीलच आहेत. कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे आणीबाणीचा प्रसंग ओढवलेला आहे. या प्रसंगात व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या चुका याकडे संघटनेने जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असून त्याला लागलीच आळा घालून गोरगरीब जनतेला सहकार्याचा हात दिला पाहिजे.