कणकवली : एकीकडे राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून उल्लेख करायचा, परंतु त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे. असे धोरण महामंडळाने अवलंबिले आहे. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले असून त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी एसटी कामगार संघटनेने परिवहनमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती संघटनेचे मुंबई प्रदेश सचिव दिलीप साटम यांनी दिली.याबाबत साटम यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हनुमंत ताटे यांच्यामार्फत परिवहनमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीमध्ये राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी सुरुवातीपासूनच जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. त्यांचा थेट प्रवाशांशी संबंध येत असल्याने सुमारे सात हजार कर्मचारी कोरोनाबाधित झालेले असून, १५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी परराज्यातील मजूर, विद्यार्थ्यांना आणणे व सोडण्याचे काम केलेले आहे. तर मुंबईच्या बेस्ट वाहतुकीसाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही एसटी कर्मचारी काम करीत आहेत. आता तर आपण आवश्यक प्रसंगी ऑक्सिजन टँकरची वाहतूक राज्य परिवहन महामंडळाचे चालक करतील, असे जाहीर केले आहे.५० लाखांचे विमा कवच मृतांच्या वारसांना द्यावेएसटी महामंडळाच्या वर्धापन दिनी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याबाबत काढण्यात आलेल्या परिपत्रकात जाचक अटींचा समावेश असल्याने ५० लाखांचे विमा कवच फक्त ८ ते १० जणांच्या वारसांना मिळाले. इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरूप वेगळे आहे.
त्यामुळे कोरोनाने मृत पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा कवच मिळण्यासाठी सध्याच्या अटींचा फेरविचार करून सर्वच कोरोना मृतांच्या वारसांना विमा कवचाची रक्कम मिळण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. एसटीच्या सेवेत कर्मचारी मृत झाल्यास त्याच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद असताना मध्यवर्ती कार्यालयाच्या स्तरावर त्याची अंमलबजावणी केली जात नाही.एसटी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावेकोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्याबाबत निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यांना १४ दिवसांची विशेष रजा मिळणे आवश्यक असताना ती दिली जात नाही. तसेच इतर आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येते, त्याचप्रमाणे सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशा विविध प्रलंबित प्रश्नांचा समावेश आहे.