मालवण : आंबा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून मुंबईहून चाकरमान्यांना गावी आणले जात असल्याची जिल्ह्यातील तिसरी घटना उघडकीस आली आहे. वाशी मार्केट येथून गावातील मित्राला सिंधुदुर्गात आणल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी नांदोस येथील दोघांवर गुन्हे दाखल करीत ट्रक व दुचाकीही जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली.देवगड तालुक्यातील गोवळ येथील दत्ताराम रामचंद्र कोकरे यांच्या मालकीच्या ट्रकवरील चालक दत्ताराम मोहन गावडे (रा. नांदोस) हा देवगड येथून आंब्याचा ट्रक (क्रमांक एम. एच. ०७, एक्स-१०९९) घेऊन मुंबई वाशी मार्केटमध्ये गेला होता. यावेळी गावडे याने आपला मित्र संदेश धोंडी गावडे याला बोलावून घेतले.
हे दोघेही आंब्याच्या ट्रकमधून देवगड-गोवळ येथे ७ एप्रिलला माघारी परतले. गोवळ येथे आल्यावर गावडे याने ट्रकमालक दत्ताराम कोकरे यांना संदेश हा आपला मित्र असल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोघेही ट्रकमालक कोकरे यांचा चुलतभाऊ प्रदीप गंगाराम कोकरे यांची दुचाकी (क्रमांक एम. एच. ०७, एएफ- ०२९५) घेऊन तालुक्यातील नांदोस गावी आले.ट्रकचालक दत्ताराम गावडे याने मुंबईहून देवगड गोवळ येथे माघारी परतताना तपासणी नाक्यावर खोटी माहिती दिल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती खबरदारी घेत असताना आंबा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून असे चाकरमानी आणले जात असतील तर ते अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आंबा, चिरे, वाळू वाहतूक करणाऱ्या चालकांना चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य ती समज द्यावी, अशा सूचना पोलीस प्रशासनाने केल्या आहेत.