कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या व मुंबई सीएसटीवरून १८ मार्च रोजी आलेल्या मंगलोर एक्सप्रेस या गाडीतील आसन नंबर एस ३ - ४९ वरून प्रवास करणारा मेंगलोरच्या दिशेने गेलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. प्रशासनानेही जलदगतीने पावले उचलत त्याबाबत माहिती घेतली. रेल्वेच्या त्या बोगीतून रत्नागिरीला काही तर कणकवलीला सात प्रवासी उतरल्याचे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. त्यानुसार प्रशासनाने केलेल्या चौकशीत तीन प्रवासी कणकवली तालुक्यातील होते.तीन प्रवाशांपैकी दोन प्रवासी बहीण - भाऊ होते. यातील बहीण २१ मार्च रोजी परत मुंबईला गेली आहे. तर त्यातील भाऊ हा तालुक्यातील एका गावात आपल्या आईसोबत राहिला होता, अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने त्या मुलाला व त्याच्या आईला तपासणीसाठी ओरोस येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. तर त्या मुलीची बहीण असलेली महिला प्रवासीही तालुक्यात येऊन परत मुंबईला गेली आहे.
तिच्या संपर्कात आलेल्यांचाही शोध सुरू आहे. याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यातील एक प्रवासी मुलगा व आईला ओरोस तेथील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. मंबईला परत गेलेल्या प्रवासी महिलेबाबत वरिष्ठ पातळीवर कळविण्यात आले आहे. तर तिसऱ्या प्रवासी महिलेचा शोध व पुढील कार्यवाही सुरु असल्याचे सांगण्यात आले.