कणकवली : इचलकरंजी येथे गेलेले एक कुटुंब जानवली येथील नातेवाईकांच्या घरी मुक्कामाला आले. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नातेवाईक रहात असलेल्या घराच्या मालकासह ग्रामस्थांनी त्यांना मुक्काम करण्यास विरोध केला. तरीही ते कुटुंब तेथून जाण्यास तयार नसल्याने याबाबतची तक्रार ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयातून याबाबतची माहिती आरोग्य विभागास देण्यात आली. परंतु परजिल्ह्यातील त्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्याबाबत वेळकाढूपणा होत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर चर्चेअंती जानवलीत आलेल्या त्या कुटुंबाला वेंगुर्ला येथील त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले.इचलकरंजी येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेले एक कुटुंब तान्ह्या बाळासह मंगळवारी रात्री जानवली गावात भाड्याने राहणाऱ्या आपल्या भावाकडे काही दिवस मुक्कामासाठी आले होते. याबाबतची माहिती घरमालकांना समजताच त्यांनी त्या कुटुंबाला आपल्या गावी जाण्यास सांगितले. मात्र, त्या कुटुंबाने जाण्यास नकार दिला. त्यामुळे याबाबतची तक्रार जानवली ग्रामपंचायत कार्यालयात केली.
परजिल्ह्यातील त्या कुटुंबाला होम क्वारंटाईन शिक्का मारला तर त्यांना कणकवलीतच मुक्काम करावा लागणार, ही बाब घरमालक तसेच जानवली ग्रामस्थांच्या लक्षात आली. तर परजिल्ह्यातून आलेले ते कुटुंब आमची कणकवली शासकीय विश्रामगृहात व्यवस्था करा, अशी आग्रही मागणी करू लागले. त्याला ग्रामस्थांनी विरोध केला.
सुमारे तीन तासांच्या चर्चेनंतर इचलकरंजीहून आलेले हे कुटुंब आपल्या मूळ गावी वेंगुर्ला येथे जाण्यास तयार झाले. त्यासाठीचा वाहन परवाना प्रशासनाने उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी त्यांनी केली. या दरम्यान तेथे आरोग्य विभागाचे मांजरेकर आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात आले. त्यांनी वेंगुर्ल्यापर्यंत वाहन पास उपलब्ध करण्याची व्यवस्था केली. त्यानंतर इचलकरंजीतील ते कुटुंब वेंगुर्ल्याकडे रवाना झाले.जिल्हा परिषद सदस्या श्रीया सावंत, पोलीस पाटील मोहन सावंत, ग्रामपंचायत सदस्य गजानन रेडकर, ग्रामसेवक अर्चना लाड यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन माहिती घेतली. त्याचबरोबर दामोदर सावंत, अमोल राणे, संदीप सावंत, श्रीकृष्ण राणे, संदीप साटम आदी ग्रामस्थ तेथे दाखल झाले होते.