मालवण : मसुरे टोकळवाडी येथील प्रीती प्रमोद खोत यांच्या घराला लागलेल्या आगीत फ्रीज, फॅन, संसारोपयोगी साहित्य, कपडे आणि इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास घरातील लाकडी छप्पराला ही लाग लागली.प्रीती खोत यांच्या घरातील स्वयंपाकघरात आग लागली. घरातील लाकडी छपरातून धूर येत असल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्या मनोज खोत या युवकास दिसून आले. लागलीच त्याने शेजारी घर असलेल्या सरपंच संदीप हडकर याना याबाबत माहिती देत आग लागलेल्या जागी धाव घेतली. व वाडीतील इतर युवकांच्या मदतीने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आग लागली तेव्हा घरातील लोक बाजारात गेले होते.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, मसुरे पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार पी. बी. नाईक, हरिश्चंद्र जायभाय, देवेंद्र लुडबे, पोलीस पाटील सोमा ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेत सहकार्य केले. तलाठी धनंजय सावंत यांनी नुकसानीचा पंचनामा केला. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता.
मसुरेतील प्रीती खोत यांच्या घराला आग लागल्याने घरातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.