कणकवली : कोरोना व्हायरसचा संपूर्ण नाश व्हावा तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या भिरवंडेवासीय व त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य उत्तम राहावे . यासाठी भिरवंडे येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात असंख्य दिवे प्रज्वलित करण्यात आले. या दीप तेजातून कोरोना व्हायरसपासून रक्षण करण्याची सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ देत असे साकडे श्री देव रामेश्वर चरणी घालण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष तथा भिरवंडे देवालय संचालक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या संकल्पनेतून हे दीप तेजोमय करण्यात आले होते . कोरोना व्हायरसचे संकट समोर उभे राहिले आहे . लॉक डाऊन तसेच संचारबंदी यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
यापासून बचाव करण्यासाठी नानाविध उपायोजना राबविल्या जात आहेत . यातील महत्त्वाची उपायोजना म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्याची शक्ती ,मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे.केंद्र व राज्य शासनाकडून जाहीर करण्यात येत असलेल्या आदेशांचे पालन करण्याची मानसिकता प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. याच भावनेतून श्री देव रामेश्वर मंदिरात दीप तेजोमय करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. काही मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी मंदिराचा सभामंडप दिव्यांनी उजळून निघाला .नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत अनेक कोकणवासीय वास्तव्याला आहेत. या सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे . त्यांच्यामध्ये कोरोनाचा प्रतिकार करण्याची ऊर्जा निर्माण होउ दे , असे साकडे श्री देव रामेश्वर चरणी घालण्यात आले
कोकणी माणूस हा मुळातच श्रद्धाळू आहे तो जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी गाव आणि गावची ग्रामदेवता यावर त्याचे नितांत श्रद्धा असते . याच श्रद्धेला उभारी मिळावी आणि कोरणा विरुद्धची लढाई जिंकण्याची मानसिकता मना मनामध्ये निर्माण होऊ दे. याच भावनेतून हे दीप तेजोमय करण्यात आले होते, असे सतीश सावंत व ग्रामस्थांनी सांगितले