सुधीर राणे
कणकवली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतने नागरिकांसाठी शहरातील मध्यवर्ती अप्पासाहेब पटवर्धन चौकात खास निर्जंतुकीकरण कक्ष बनवला आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जनहित लक्षात घेऊन त्यासाठी पुढाकार घेतला आहे.कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे तसेच नगरसेवकांशी चर्चा करून शहरवासीयांच्या हितासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी निर्जंतुकीकरण कक्षाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. या अत्याधुनिक सॅनिटायजर कक्षातून नागरिकांसह गाड्याही निर्जंतुक होऊन बाहेर निघणार आहेत. ऑटो स्प्रिंगरमधून हायपोल्क्लोरिनद्वारे सॅनीटरायजेशन होणार आहे.
शुक्रवारी सकाळपासून कणकवली नगरपंचायतचा हा अत्याधुनिक निर्जंतुकीकरण कक्ष कणकवलीकरांच्या सेवेसाठी कार्यरत झाला आहे. या कक्षातून गेल्यानंतर सर्वांगावर जंतुनाशक औषधाची फवारणी होते.जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्यानंतर नागरिकांच्या शरीरावर तसेच कपड्यांवर कोरोनाचे विषाणू पसरू शकतात. या निर्जंतुकीकरण फवारणीमुळे कपड्यावरील आणि शरीरावरील विषाणू मरून जातात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी कणकवली नगरपंचायतने उचललेल्या या पावलाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.