सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव कोरोना बाधित रुग्णाचे नंतर चे दोन्ही रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी त्याला आज ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ग देण्यात आला. रुग्ण बरा होऊन घरी जात असल्याचे आपल्याला समाधान असल्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांनी दिली.मेंगलोर एक्सप्रेस मधून मुंबई ते कणकवली प्रवास करताना(१८ रोजी) त्या तरुणाला सहप्रवाशा कडून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला होता. दरम्यान कणकवली तालुक्यातील त्या रुग्णाचे कोरोना पोसिटीव्ह रिपोर्ट २६ मार्च ला प्राप्त झाल्या नंतर त्याला ओरोस येथील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते.
१४ दिवसांनी त्याचे रिपोर्ट पुन्हा केले असता त्याचे पुढील दोन्ही रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. हा अहवाल ३ एप्रिल रोजी प्राप्त झाला होता. त्यानंतरचे पुढील काही दिवस त्याला निगराणी खाली ठेवण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली या वैद्यकीय अधिकारी परिचारिका व ब्रदर यांनी उपचार केले होते. त्यानंतर आज ९ एप्रिल रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. पुढील १४ दिवस त्याला होम कॉरनटाईन केले आहे असे प्रशासनाच्या वतीने सांगितले. सध्यस्थीतीत जिल्ह्यात एकही कोरोनो चा रुग्ण नाही.
जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्याला यश ही मिळत आहे. जिल्हा कोरोना मुक्त झाला असला तरी जनतेने यापुढेही असेच सहकार्य करा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.