वैभववाडी : कोणतीही कला अथवा छंद हे माणसाला जीवनाकडे वेगळ्या अंगाने पाहण्याचा दृष्टीकोन देत असतात. तर कधी कधी हीच कला किंवा छंद कालांतराने समाज प्रबोधनाचे माध्यमही बनते. याचेच उदाहरण म्हणून वैभववाडी तालुक्यातील लोरे मोगरवाडी शाळेचे शिक्षक युवराज पचकर यांनी जपलेल्या आणि जोपासलेल्या चित्रकलेकडे पाहता येईल.कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा पर्याय वापरला. या काळात अनेकांनी आपले छंद जोपासले तर काहींनी वेगळ्या वाटा निर्माण केल्या.
युवराज पचकर यांनीही कुठलेही प्रशिक्षण न घेता आपले शालेय कामकाज पाहत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला. केवळ आवड म्हणून जोपासलेल्या चित्रकलेच्या छंदातून कोरोना संकटात सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. पचकर यांनी पेन्सिल, स्केचपेन, रंगीत खडू, वॉटर कलर किंबहुना सहज उपलब्ध होणाऱ्या व हाती सापडेल त्या एकेका रंगातून विविधांगी छटा कागदावर रेखाटून त्या समाज माध्यमांद्वारे जनतेच्या मनावर उमटविण्याचा प्रयत्न केला.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पचकर यांनी जवळपास १०० हून अधिक चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांद्वारे कोरोना विषाणूबाबत जनजागृती केली. वैयक्तिक व सामूहिक कोणती काळजी घ्यावी? शासनाच्या नियमांचे पालन कसे करावे? कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींशी कसे वागावे? बिकट परिस्थितीत माणुसकी कशी जपावी? असे विविध संदेश त्यांनी या चित्रांतून दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या या कल्पकतेचे कौतुक केले गेले. त्यांच्या या सामाजिक दृष्टीकोनाचे सर्वत्र कौतुक होत असून गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, मुख्याध्यापक किशोर पेडणेकर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आहे.
केवळ कल्पकतेतून पचकर यांनी स्वत:ची चित्रकला विकसित करून या कलेचा ग्रामीण मुलांना गुणवत्ता वाढीसाठी कसा उपयोग करता येईल, यासाठी प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने खास शालेय विद्यार्थ्यांसाठी भविष्यात चित्रप्रदर्शन भरविण्याचा संकल्प युवराज पचकर यांनी व्यक्त केला आहे.