कणकवली : शहरात सध्या कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत. तसेच यापूूर्वीही शहरात बाधित रुग्ण सापडल्याने त्याहीवेळी कंटेन्मेंट झोन करण्यात आला होता . सातत्याने होणाऱ्या कंटेन्मेंट झोनमुळे व्यापारी, नागरिकांना त्रास होत असून बाधित व्यक्तीचे घर, इमारतच कंटेन्मेंट करावी.
निगेटिव्ह आलेल्यांना १४ दिवसांचे होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात येऊ नयेत. ही कार्यवाही जिल्हास्तरासाठी लागू करावी, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे आपण दूरध्वनीद्वारे केली असल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली आहे.शहरी भागात सातत्याने होत असलेल्या कंटेन्मेंट झोनमुळे व्यापारी, नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यापूर्वीही शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर कंटेन्मेंट झोन करण्यात आला होता. आता पुन्हा कंटेन्मेंट झोन करण्यात आला असून भविष्यातही हा धोका कायम आहे.अशा स्थितीत संबंधित बाधित व्यक्तींचे घर अथवा इमारतच कंटेन्मेंट झोन करावी. जर चाचणी अहवाल निगेटीव्ह आला असेल तर त्या व्यक्तीच्या हातावर १४ दिवस क्वारंटाईनचे शिक्के का मारण्यात येतात? ते बंद करावेत.