कणकवली : कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागरिक दूरचा प्रवास टाळत आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला गाड्यांच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. सिंधुदुर्ग विभागाला विविध आगारातून एस.टी.च्या ५६९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे सुमारे ४ लाख ७४ हजार ४०६ रुपयांच्या उत्पन्नाला सिंधुदुर्ग विभागाला एकाच दिवशी मुकावे लागले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजले जात आहेत. शासनाने नागरिकांवर विविध निर्बंध घातले असून शक्यतो प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. या विषाणूच्या प्रभावामुळे राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांकडूनही शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे.अनेकांनी प्रवास करण्याचे टाळल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी एसटीच्या ५६९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे २० हजार ९६० किलोमीटर एसटी धावलेली नाही. शाळांना सुट्टी दिलेली असल्याने विद्यार्थ्यांअभावी ३९३ शालेय फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. तशीच काहीशी स्थिती शनिवारीही होती.
यादिवशीही अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या प्रवासी उपलब्ध नसल्याने अर्ध्यावरून मागे येत असल्याचे एसटीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या सर्व बाबींमुळे एसटीच्या सरासरी उत्पन्नात घट होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत शासनाने विविध निर्बंध कायम ठेवले असून मनाई आदेश काढले आहेत मात्र, लांब पल्ल्याच्या गाड्या गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात बंद करण्यात आल्या आहेत. पार्श्वभूमीवर एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.अंमलबजावणीशासनाने कार्यालयांमधील उपस्थिती ३१ मार्चपर्यंत २५ टक्के करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अगदी अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी शासकीय कार्यालयात यावे. अन्यथा काही दिवसानंतर आपले काम करून घ्यावे. असे आवाहन तहसीदारांनी केले आहे. शासकीय कार्यालयांना सुटीच रहाणार आहे.