मालवण : कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून मालवण शहर कोरोनामुक्त राखण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र, गुरुवारी शहरात कोरोनाची दोघांना लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहरवासीयांमध्ये घबराट पसरली आहे.
ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये हे दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यातील एक जण शहरातील एका बँकेचा कर्मचारी आहे तर दुसरा तहसील कार्यालयाचा कर्मचारी आहे. दरम्यान, कोरोनाबाधित निदान झालेले दोघेही जण तासगाव (जि. सांगली) येथून ३० जुलै रोजी मालवण येथे आले होते.त्या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. बँक कर्मचारी हा बांगीवाडा तर तहसील कर्मचारी मेढा येथे भाड्याच्या खोलीत राहत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.चार महिन्यांपेक्षा जास्त काळ कोरोनामुक्त राहिलेल्या मालवण शहरात कोरोनाने शिरकाव केला आहे. ३० जुलै रोजी तासगाव सांगली येथून शहरात दोघेजण आले होते. यातील बँक कर्मचारी होम क्वारंटाईन होता.
त्या व्यक्तीला ताप आल्याने गुरुवारी त्याची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्याचवेळी त्याच्यासमवेत सांगलीहून आलेल्या महसूल कर्मचाऱ्याची चाचणी केली असता तेही पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे संपूर्ण यंत्रणेत खळबळ उडाली आहे.जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले तरी मालवण शहरात मागील चार महिन्यांत एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मालवण नगरपरिषद, आरोग्य विभाग, सर्व शासकीय कार्यालये आणि पोलीस प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेताना कोरोनाचा फैलाव न होण्यासाठी मेहनत घेत होते.त्यामुळे जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, देवगड, वेंगुर्ला अशा सर्वच शहरात रुग्ण आढळले तरी मालवण शहरात एकही रुग्ण आढळून आला नव्हता. त्यामुळे मालवण कोरोनामुक्त शहर होते. मात्र, आता नव्याने दोन कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने मालवण शहरात घबराट पसरली आहे.