वेंगुर्ला : तालुक्यातील आसोली- फणसखोल येथील एक जण कोरोनाबाधित आढळला आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ झाली आहे. यातील वायंगणी व मातोंड येथील २ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मातोंड येथील दुसऱ्या रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली आहे.तालुक्यातील वायंगणी येथे मुंबई येथून आंबा वाहतूक करून आलेला वाहनचालक हा पहिला कोरोना रुग्ण तालुक्यात सापडला होता. त्यानंतर मातोंड येथे प्राथमिक शाळेत क्वारंटाईन असलेले २ सख्खे भाऊ एकामागून एक कोरोनाबाधित आढळले होते.
यानंतर आता आसोली फणसखोल येथे मुंबईवरून आलेला व होम क्वारंटाईन असलेला एक जण कोरोनाबाधित आढळल्यामुळे पुन्हा एकदा शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे. फणसखोल येथील कोरोनाबाधित आढळलेली व्यक्ती २ जून रोजी १७ सीटर वाहनाने मुंबईवरून आला होता. त्याच्यासोबत मळेवाड येथील ९ तर बांदा येथील ३ जण याच गाडीने प्रवास करून आले होते.फणसखोल येथील या व्यक्तीला घराच्या मागील पडवीत क्वारंटाईन करण्यात आले होते. तर मुख्य घरात त्याचे आई-वडील वास्तव्यास आहेत. ६ जून रोजी ताप आल्याने त्या व्यक्तीला ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, सोमवारी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली.आसोलीत ३०० मीटर परिसर कंटेन्मेंट झोन जाहीरआसोली-फणसखोल येथे एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाने त्वरित याठिकाणी भेट देत ३०० मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. तसेच गणेश मंदिराच्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेट्सही लावला आहे. आसोली येथे कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याचे समजताच वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे, पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर-सामंत, विस्तार अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी करीत सुमारे ३०० मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. यावेळी आसोली सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व मंडल अधिकारी उपस्थित होते.