बांदा : बांद्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. निमजगावाडी येथील २७ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना बाधित युवक स्थानिक असून दिवसभरात त्याच्या संपर्कात आलेल्या ३४ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. बांदा-निमजगा येथील ३०० मीटर परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आल्याने रात्री सील करण्यात आला आहे.
बांद्यात महिनाभरापूर्वी मुंबईहून आलेली व संस्थात्मक क्वारंटाईन असलेली व्यक्ती कोरोना बाधित मिळाली होती. मात्र, आता स्थानिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळीच पोलीस, ग्रामपंचायत, महसूल प्रशासनाचे अधिकारी निमजगा येथे दाखल होत परिसराचा आढावा घेतला. त्या युवकाच्या घरातील इतर सर्व व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे.यावेळी सरपंच अक्रम खान, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष साई सावंत आदी उपस्थित होते. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने स्थानिक प्रशासन सतर्क झाले.
ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यास आली. स्थानिक नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन यावेळी सरपंच खान यांनी केले आहे. यावेळी सरपंच खान, संजू विर्नोडकर टीमचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.रास्त धान्य दुकान राहणार बंदबांदा शहरात निमजगावाडी येथील तरुण कोरोना बाधित सापडला आहे. या तरुणाचे वडील येथील सोसायटीत धान्य वितरक असल्याने ग्राहकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने सोसायटी व दोन्ही धान्य दुकाने सोमवार २७ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विकास सोसायटीचे कार्यालय व दोन्ही धान्य दुकाने बंद राहणार असल्याने ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन चेअरमन बांदेकर व सचिव भाईप यांनी केले आहे.रुग्णाच्या संपर्कातील ४७ जणांचा आरोग्य विभागाने शोध घेतला. त्यातील ३४ व्यक्ती या अतिजोखिमग्रस्त असून उर्वरित १३ मध्यम जोखिमग्रस्त आहेत. या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.