खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावात सध्या कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच दिवशी पाच जणांना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, सापडलेल्या ५ रुग्णांंमध्ये १ पुरुष, २ महिला आणि २ मुलांचा समावेश आहे.खारेपाटणमध्ये गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी येथील कार्यक्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायत कार्यालयात तातडीची बैठक घेतली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गुरव, योगेश पाटणकर, मधुकर गुरव, ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर, आरोग्य सहाय्यक खोत आदी उपस्थित होते.या बैठकीत बाजारपेठेसह संपूर्ण गावाचा सर्व्हे करून येथील प्रत्येक नागरिकांची थर्मल गनने तपासणी करण्याचे ठरविले. कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीला तातडीने खारेपाटण रॅपिड टेस्ट सेंटरमध्ये स्वॅब तपासणी करण्याकरिता पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.रुग्णसंख्या झाली बारा, एकाच कुटुंबातील चौघेखारेपाटणमध्ये कपिलेश्वरवाडी येथे ४ दिवसांपूर्वी एका युवकाचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील हायरिस्कमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये त्याचे वडील, आई व दोन लहान भावंडे यांचा समावेश होता. तसेच ४ व्यक्तींचे स्वॅब तपासणी करण्याकरिता घेण्यात आले.
अखेर या एकाच कुटुंबातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर खारेपाटण बाजारपेठ येथील एका व्यावसायिकाच्या पत्नीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या पाचवर पोहोचली आहे. तर खारेपाटण गावामध्ये आता कोरोना बाधित व्यक्तींची एकूण संख्या १२ वर जाऊन पोहोचली आहे. यामधील १0 कोरोना बाधित रुग्ण सक्रिय असून उर्वरित दोन रुग्ण यापूर्वीच बरे होऊन घरी परतले आहेत.