सावंतवाडी : शहरातील चितारआळी येथील आठ जण कोरोना बाधित मिळाल्यानंतर समूह संसर्ग टाळण्यासाठी पालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. दुधाच्या नावाखाली चालणाऱ्या सर्व बेकरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच त्या दाम्पत्याने मुंबईहून सावंतवाडीत आल्यानंतर कोणतीही खबरदारी घेतली नसल्याने दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.शहरातील दुकानदारांनीही खबरदारीचा उपाय म्हणून मास्क तसेच हॅण्डग्लोज वापरावेत, असे आवाहन केले आहे. काही दुकानदारांनी पुढील काही दिवस दुकाने बंद ठेवल्यास त्यांना पालिका सहकार्य करेल, असेही सांगितले आहे. कोरोनाबाबतची माहिती देण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी सकाळ, संध्याकाळ उपलब्ध व्हावेत अशा सूचना देण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.शहरात मुंबईहून आलेले दाम्पत्य कोरोना बाधित झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी वाढत आहे. हायरिस्कमधील काही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी रविवारी सहा जण बाधित सापडल्यानंतर पालिकेने अधिक कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने सोमवारी सकाळी सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.या बैठकीस चारही सभापती उपस्थित होते. यावेळी शहरात सापडलेल्या रुग्णांबाबत व चितारआळी येथे भविष्यात कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत याची माहिती नगराध्यक्ष परब यांनी सहकाऱ्यांना दिली.
चितारआळी भागात पालिकेचा आरोग्य विभाग योग्य ती खबरदारी घेत असून, तेथील नागरिकांना कोणत्या वस्तू हव्या असल्यास स्वयंसेवकांचे फोन क्रमांक दिले आहेत. त्यांनी संपर्क करावा, असे सांगण्यात आले.दरम्यान, ते दाम्पत्य कोणाकोणाला भेटले होते त्यांची यादी प्रशासनाने तयार केली असून, त्या पद्धतीने आरोग्य विभाग काम करीत आहे. मात्र, सावंतवाडी शहरातील नागरिकांनाही याची माहिती व्हावी म्हणून पालिकेचे डॉक्टर सतत कार्यरत राहणार आहेत.
सावंतवाडी शहरात मास्क न लावता फिरत असल्यास त्याच्यावर कारवार्ई केली जाणार असून, बेकरीच्या नावाखाली काही जण दूध विक्रीचा धंदा करतात, पण ते मास्कचा वापर करीत नाहीत. असे काही जण आढळून आले असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे यावेळी परब यांनी सांगितले आहे. व्यापारीवर्गानेही सावंतवाडी शहरात मिळणारे कोरोना रुग्ण रोखायचे असल्यास स्वत:हून दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन परब यांंनी केले.