कणकवली : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपचार केल्यास ते लवकर बरे होतील. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लाझ्मा बँक तयार करून कोरोना रुग्णांवर उपचार करा, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी एका पत्राद्वारे जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.या पत्रात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्लाझ्मा बँक महत्त्वाची आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा. सध्यात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे सुमारे १५४ रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाचे उपचार होऊन बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात कोरोना विरूद्ध अँटीबॉडी तयार झाली आहे. त्यामुळे या रुग्णांच्या रक्तामधील प्लाझ्मा जमा करून त्यांची प्लाझ्मा बँक तयार केल्यास त्याआधारे सध्याच्या व भविष्यातील रुग्णांवर उपचार केल्यास ते लवकर बरे होतील. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी होईल. तरी याप्रमाणे कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, असे आमदार नीतेश राणे यांनी म्हटले आहे.