दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात अद्यापपर्यंत एकाही व्यक्तीचा कोरोनाने बळी घेतला नव्हता. मात्र, मंगळवारी शहरातील एका व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनाने या घेतलेल्या पहिल्या बळीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.दोडामार्ग तालुक्यात गणेश चतुर्थीनंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. चतुर्थीपूर्वी फक्त क्वारंंटाईन केलेल्या व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह येत होते. मात्र, होम क्वारंंटाईनमुळे स्थानिक नागरिकांचे अहवालही पॉझिटिव्ह येऊ लागले. बघता बघता तालुक्यात कोरोनाचा विळखा पडला. कोरोनाची झपाट्याने संख्या वाढू लागल्याने नागरिकांत भीती आहे. तरीही वाढत्या संख्येपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तालुकावासीयांना दिलासादायक ठरत आहे.मंगळवारी दोडामार्ग शहरातील सुरुचीवाडी येथील एका कोरोना बाधित व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. ती व्यक्ती बँक आॅफ इंडियाची कर्मचारी होती.
दहा दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना मधुमेहाचा आजार असल्याने येथील आयटीआयमधील कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना न ठेवता ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना सकाळी साडेअकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिकृत माहिती दिली.ग्रामीण रुग्णालय दोन दिवस बंदसोमवारी एकाच दिवशी तालुक्यात २२ कोरोना बाधित रुग्ण मिळाले. त्यात रुग्णालयातील कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालय निर्जंतूक करण्यासाठी अतिदक्षता विभाग वगळता मंगळवार व बुधवार दोन दिवस रुग्णालय बंद ठेवले आहे.कळणे बाजारपेठेत निर्जंतुकीकरणकळणे गावात सोमवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. त्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व व्यापारी यांनी संयुक्त बैठक घेतली. मंगळवारी बाजारपेठ एक दिवस बंद ठेवून निर्जंतुकीरण करण्यात आले.