दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेतील एकाच कुटुंबातील चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सेविकेचा अहवालही पॉझिटिव्ह आला. बाजारपेठेतील स्थानिक बाधित मिळाल्याने दोडामार्ग शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.दोडामार्ग बाजारपेठेतील बाधित मिळालेल्या त्या कुटुंबातील एक व्यक्ती आजारावरील उपचारासाठी म्हापसा गोवा येथील जिल्हा रुग्णालयात गेली होती. तेथे त्यांची कोविडची चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याबाबत रुग्णालय प्रशासनाने दोडामार्ग आरोग्य विभागाला ही माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील तिघांची चाचणी करण्यात आली. त्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले.
दरम्यान अन्य सदस्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय अधिकारी आणि एक आरोग्य सेविका यापूर्वी बाधित आढळले आहेत. त्यात आता एका आरोग्य सेविकेची भर पडली आहे.
शुक्रवारी एका पोलिसाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अधिकाऱ्यांसह दहा कर्मचाऱ्यांचे स्वॅब शनिवारी घेण्यात आले. आरोग्य विभाग आणि पोलीस खाते यात कोरोनाने शिरकाव केल्याचे उघड झाले आहे.दोडामार्ग शहरातील एका कुटुंबातील चार सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली. बाजार पेठेतील ५० मीटर परिसर नगरपंचायतीने निर्जंतूक केला आहे. नगरपंचायतीने तत्काळ बाजारपेठेतील परिसरात निर्जंतुकीकरण केल्याने डॉ. अमोल देसाई व डॉ. नंदकिशोर दळवी यांनी आभार व्यक्त केले.