सिंधुदुर्गनगरी : कोरोना विषाणूचा अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने घेतलेली खबरदारी कौतुकास्पद आहे. या विषाणूविरोधात आरोग्य यंत्रणेला आता आणखी बळ मिळणार आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.
आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आता जिल्ह्यातील खासगी डॉक्टर पुढे आले आहेत. ते आरोग्य यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणार असून हे डॉक्टर कोरोनाला थांबविण्यासाठी परगावातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यासाठी मदत करणार आहेत. आपला जीव आपण वाचवा, असे आवाहन खासदार राऊत यांनी केले आहे.जिल्ह्यातील डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्गने खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र पाताडे, दर्शना कोलते, विद्याधर तायशेटे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी कोरोना विषाणूवरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. प्रशासन व आरोग्य यंत्रणेला लागणारे सहकार्य खासगी डॉक्टरांतर्फे केले जाईल असे डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लबतर्फे सांगण्यात आले. यावेळी खासदार राऊत यांनी माहिती दिली.आपला जीव आपल्याच हाती कोरोना विषाणू रोखण्यासाठी हा कर्फ्यू आहे. त्यामुळे आपला जीव आपणच वाचवावा यासाठी जनतेने घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन खासदार राऊत यांनी केले आहे.