कणकवली : ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ७० टक्के रुग्ण बाहेरचे जेवण घेतात. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तींचा रुग्णालयात मुक्त संचार आहे. याखेरीज रुग्णालयात पुरेशी स्वच्छता राखली जात नसल्याने हे जिल्हा रुग्णालय कोरोनाचे प्रसारक झाल्याचा आरोप मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून वापरले जात आहे. मात्र, येथे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ११ सप्टेंबरला तब्बल १० तास पाणी नव्हते.
याखेरीज पूर्वी उपचार घेऊन गेलेल्या रुग्णाच्या चादरी, उशा तशाच ठेवून तेथे आलेल्या दुसऱ्या रुग्णाला ठेवले जाते. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कर्मचाऱ्यांची कोणतीही काळजी घेत नाहीत. रुग्णांचे नातेवाईक, चहा व जेवण देणारे सुरक्षितता न बाळगता कोविड सेंटरमध्ये ये-जा करत आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका आणखीच वाढत आहे.जिल्हा रुग्णालयातील या गैरसोयीबाबत काही रुग्णांनी आपल्याकडे म्हणणे मांडले आहे. त्यानुसार शुक्रवारी रुग्णालयात तब्बल १० तास पाणी नव्हते. अशा स्थितीत आंघोळ व इतर स्वच्छतेची कामे कशी होणार ? या बाबींमुळे कोरोनाचा संसर्ग आणखीनच वाढत आहे.
कोविड सेंटरमध्ये गरम पाण्याची बाटली १५ रुपयाने घ्यावी लागत आहे. आॅक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या सिलिंडरची वाहतूक परिचारिका व नातेवाईकांना करावी लागत आहे. आॅक्सिजन संपला तर लक्षात येत नाही आणि लक्षात आल्यानंतर पळापळ केली जाते.कॅन्टीनमधील जेवण योग्य नसल्याने ७० टक्के लोक बाहेरच्या खानावळीतून जेवण मागवतात. कॅन्टीन व खानावळीतून जेवण घेऊन येणारे सुरक्षितता न बाळगता वॉर्डात फिरतात. पुन्हा ते आपल्या कॅन्टीनमध्ये जाऊन इतरांनाही नाश्ता देत असल्याने संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. मात्र, वॉर्ड फुल्ल करून ठेवलेला आहे. कोणी बघत नसल्याने नातेवाईक आत जातात. यामुळे संसर्ग वाढत आहे.