कणकवली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कणकवली शहरात मोठ्या संख्येने वाढत असून कोरोनाबधितांच्या संख्येतही भर पडत आहे. २० ते २७ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय कणकवली नगरपंचायत व्यापारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी , शहरातील प्रमुख नागरिक यांचा बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे या कालावधीतील आठ दिवसांचा बाजार खरेदीसाठी नागरिकांची सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी दिसून येत होती.कणकवली शहरात शुक्रवारी दिवसभर पावसाने जोर धरला होता. मात्र, ग्राहकांसह वाहनांची संख्या वाढल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली. याच दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा मात्र पार फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करणाऱ्या ग्राहकांना कोरोना विषाणूची भीती नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. कणकवली नगरपंचायतसह, कणकवली पोलीस प्रशासन विविध माध्यमातून कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन करीत असून त्याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. हे धोकादायक ठरत आहे.नगरपंचायतीच्यावतीने स्पीकर वरून उद्घोषणा करून जनता कर्फ्यू बाबत शहरात जागृती करण्यात आली. तर पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस, होमगार्ड गर्दी न करण्याचे आवाहन नागरिकांना करीत होते. तसेच वाहतूक पोलिसांकडून गाडीची कागदपत्रे, गाडी चालविण्याचा परवाना यांची तपासणी होत होती.