महेश सरनाईकसिंधुदुर्ग : जिल्ह्यात कोरोनावाढीचा वेग झपाट्याने वाढत आहे. आॅगस्ट महिन्यात गुरुवार २७ आॅगस्टपर्यंत तब्बल ६९५ एवढे रुग्ण आढळून आले आहेत. ३१ जुलै रोजी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३६४ होती आणि आता २७ आॅगस्टला ती १०५९ वर जाऊन पोहोचली आहे.
सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे ८२ टक्के होता. आता मात्र, यामध्ये मोठी घसरण होऊन ५५.८६ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. कारण या महिन्यात झपाट्याने रुग्ण वाढले आहेत. मृत्यू दर हा १.७२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे राज्यासह देशभराच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मृत्यूदर रोखण्यात आरोग्य प्रशासनाला चांगले यश आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २६ मार्चला आढळून आला होता. त्यानंतर टप्पाटप्प्याने रुग्णसंख्या वाढत गेली. जिल्ह्यात २ मे पासून २६ आॅगस्टपर्यंत २ लाख ३ हजार व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर मार्च ते मे या काळातही ५० ते ६० हजार व्यक्ती दाखल झाल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात असणाऱ्या लोकसंख्येत अडीच लाखांनी वाढ झाली आहे. सुरुवातीला मुंबई, पुणे येथील कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्यांना कोरोनाची लागण होत होती. त्यामुळे बाहेरून येणाºया व्यक्तीच कोरोनाची शिकार बनत होते.त्यानंतर मात्र, हळूहळू जून आणि जुलै महिन्यात स्थानिकांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर स्थानिकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातच आॅगस्ट महिन्यात गणेशोत्सव असल्याने मोठ्या प्रमाणावर चाकरमानी सिंधुदुर्गात येणार हे निश्चित होते. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढेल असा कयास व्यक्त करण्यात येत होता आणि तो खराही ठरला आहे.गणेश चतुर्थी दिवशीच आढळले सर्वाधिक १३४ रुग्णजिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ व्हायला जून, जुलै महिन्यापासूनच सुरुवात झाली. मात्र, त्यावेळी दिवसभरात १0 ते १२ रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर मात्र, आॅगस्ट महिन्यात कोरानाचे दिवसभरात सर्वाधिक रुग्ण आढळायला सुरुवात झाली.
यात ४ आॅगस्टला १५, ७ आॅगस्टला १७, ८ आॅगस्टला २५, १५ आॅगस्टला ३०, १७ आॅगस्टला ४६, २१ आॅगस्टला म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी ७९ आणि २२ आॅगस्टला म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी तब्बल १३४ रुग्ण एकाच दिवशी आढळून आले.मृत्यूच्या आकड्यातही तिपटीने वाढसिंधुदुर्ग जिल्ह्यातील मृत्यूचा दर कमी ठेवण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे. राज्यासह देशातील इतर भागात मृत्यूचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामानाने जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण १.७२ टक्क्यांवर आहे.
ज्याप्रमाणात आॅगस्ट महिन्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे आॅगस्ट महिन्यातच कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. जुलै महिन्यापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या केवळ ६ होती. आता २७ आॅगस्टपर्यंत त्यात तिपटीने वाढ होऊन ती १९ वर पोहोचली आहे.