कुडाळ : कुडाळ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले असून आवश्यक असल्यास कुडाळातील काही खासगी हॉटेल क्वारंटाईन रुग्णांसाठी घेण्यात येणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासनातील सर्व विभागाच्या गाड्याही महसूल प्रशासनाकडे ठेवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र नाचणकर यांनी दिली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रशासन सज्ज झाले असून कुडाळ तालुका प्रशासनही विविध प्रकारच्या उपाययोजना राबवित आहे. या संदर्भात तहसीलदार नाचणकर यांना माहिती दिली.
ते म्हणाले, पाच दिवसांत कुडाळ तालुक्यात मुंबई तसेच परदेशातून मिळून सुमारे ५०० लोक आले असून या सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये सध्या तरी कोणीही कोरोना संशयित नाही. मात्र, सतर्कता म्हणून सर्वांची तपासणी करण्यात येत असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.तालुक्याच्या दृष्टीने अतिदक्षता म्हणून गरज वाटल्यास कुडाळातील दोन हॉटेलही क्वारंटाईन रुग्णांसाठी आरक्षित केले जाईल. तसेच इतर प्रशासकीय विभागाची काही वाहने सेवेसाठी महसूल प्रशासनाकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती नाचणकर यांनी दिली.