कणकवली : कणकवली शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण हा समूह संसर्ग वाढीस लागण्याचा धोका आहे. अशा स्थितीत आता नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे . असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. अशा स्थितीत प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे, हात वारंवार सॅनिटायझरने स्वच्छ करणे, साबण लावून हात धुणे, विनाकारण घराबाहेर न पडणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे आदी नियमांची काटेकोर अमलबजावणी करावी.कणकवली शहरातील व्यापाऱ्यांनीही दुकानांमध्ये गर्दी होऊ देऊ नये. जास्तीत जास्त लवकर दुकाने बंद करून गर्दी कशी टाळता येईल या दृष्टीने सहकार्य करावे. शहरात कोरोनाची वाढत चाललेली रुग्णसंख्या ही येत्या काळात समूह संसर्गाला निमंत्रण देण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. प्रशासनाला सहकार्य करत असताना प्रत्येकाने आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी. तसेच कुणाला सर्दी ,ताप , खोकला अशी लक्षणे असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.कंटेनमेंट झोन मधील नागरिकांनी घराबाहेर फिरू नये. आतापर्यंत कणकवली शहरवासीय, व्यापारी यांनी ज्याप्रमाणे नगरपंचायतला सहकार्य केले तसेच यापुढेही करत कोरोना प्रसार रोखण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया . असे आवाहन नलावडे यांनी केले आहे.